खवल्या मांजर, तनमोर पक्षी असलेल्या भागात वीज प्रकल्पांना ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 10:55 AM2022-10-21T10:55:07+5:302022-10-21T11:06:38+5:30
जागतिक स्तरावर घेतली नोंद, सौरऊर्जा अथवा औष्णिक वीज प्रकल्पांना परवानगी नाही
अमरावती : राज्यात खवल्या मांजर, तनमोर हे वन्यप्राणी, पक्षी अत्यंत गंभीर धोकाग्रस्त क्षेत्रात आले असून, जागतिक स्तरावर याची दखल घेतली आहे. देश अथवा राज्यात कुठेही सौरऊर्जा, औष्णिक वीजनिर्मिती उभारणी करताना त्या भागात खवल्या मांजर किंवा तनमोर असल्यास तेथे परवानगी नाही, असे निर्देश केंद्र वन व पर्यावरण मंत्रालयाने दिले आहे.
देशातून चित्ता नामशेष झाल्यानंतर तो पुन्हा भारतात आणला गेला. असे असले तरी देशातृून अनेक वन्यजीव संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हे वन्यजीव, प्राणी जगले पाहिजे, ते सुरक्षित असले पाहिजे, यासाठी वन विभागाचे प्रयत्नाची परकाष्टा चालविली आहे. महाराष्ट्रातून हद्दपार झालेला माळढोक या पक्षाला भंडारा, गोंदिया जिल्ह्यात अभय दिले जात आहे. तर विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात १९८४ च्या दरम्यान तनमोर मोठ्या संख्येने दिसायचे. मात्र, आता ते गायब झाले आहेत. खवल्या मांजर, तनमोर दाखवा अन् पैसे मिळवा, याची प्रचिती दिसून येत आहे.
जर्मनीच्या कंपनीने घातली अट
देश अथवा महाराष्ट्रात सौरऊर्जा, औष्णिक वीज प्रकल्प उभारणीसाठी जर्मन येथील के. एफ. डब्ल्यू ही कंपनी कर्ज देते. मात्र, या कंपनीने पर्यावरण संवर्धन आणि प्रकल्प उभारत असलेल्या भागात खवल्या मांजर, तनमोर, माळढोक हे धोकाग्रस्त वन्यप्राणी, पक्षांचा अधिवास असल्यास त्या भागात कर्ज पुरवठा करीत नाही. वन विभागाच्या नोंदी तपासूनच ही कंपनी कर्ज उपलब्ध करून देते, अशी माहिती आहे.
खवल्या मांजर, तनमोर का संपले
गत काही वर्षांत वाघांच्या शिकारीवर आळा घालत असताना वन विभागाचे खवल्या मांजर, तनमोर पक्षाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तनमोर पक्ष्यांची शिकार मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या पक्ष्यांचे मास सेवन केल्यास समृद्धी लाभते, भरभराट मिळते, अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे हा सुंदर तनमोर पक्षी संपण्याच्या वाटेवर आहे. खवल्या मांजराच्या पाठीवरील कवचापासून शक्तिवर्धक, औषधी, हाडांच्या आजारासाठी वापरले जात असल्याने त्याच्या मोठ्या प्रमाणात शिकारी झाल्यात. खवल्या मांजर हा सत्सन वन्यजीव आहे. खवल्या मांजर, तनमोर हे दोनही वन विभागाच्या शेडुल्ड एकमध्ये आहेत.