सौर पथदिव्यांत गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:22 AM2018-03-16T01:22:07+5:302018-03-16T01:22:07+5:30
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती.
ऑनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केली होती. यावर १५ मार्च रोजी अनुपालन अहवालात दिलेली माहिती ही संभ्रम निर्माण करणारी असल्याने झेडपी सदस्य व पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा विविध विषयांना अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, सीईओ मनीषा खत्री, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्रसिंह गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, प्रकल्प संचालक के.एम. अहमद व खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी मागील सभेत सर्व बीडीओंनी अमरावती : समाजकल्याण विभागाने सौरदिवे लावण्याबाबतची माहिती नसल्याचे सभागृहात सांगितले होते. त्यानुसार याप्रकरणी माहिती घेऊन त्याचा अहवाल आजच्या सभेत ठेवण्यात आला. मात्र, बीडीओ व समाजकल्याण विभाग तसेच पंचायत विभागाने अनुपालनात दिलेली सर्व माहिती ही गोलगोल असल्याने सदस्य संतापले. यामुळे सभागृहाचे वातावरण तापले होते. अखेर सीईओ मनीषा खत्री यांनी याबाबत चौकशी समिती नेमून पुढील सभेत यावर माहिती देण्याचे मान्य केले. त्यामुळे हा मुद्दा निवळला.
चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेड पूर्णा येथील ग्रामसेवक उईके यांनी शासकीय निधीत घोळ केल्याबाबत बीडीओंकडे तक्रारीचे काय झाले, याचा जाब बबलू देशमुख यांनी विचारला. चांदूर बाजारचे बीडीओ विशाल शिंदे यांनी संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. त्यांच्याकडील पदभार हा अकोलकर नामक ग्रामसेवकाला सोपविला आहे. मात्र, त्यांना पदभार सोपविण्यास उईके हे टाळाटाळ करीत असल्याने त्यांना तीन कारणे दाखवा नोटीस बजावल्यात. त्यानंतर त्यांनी आता पदभार सोपविला आहे. यानुसार दस्तावेजाची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृहाला मिळाले. नांदगाव तालुक्यातील अडगाव व मांजरी म्हसला येथील सिंचन विहीर घोळप्रकरणी दोषींवर कोणती कारवाई केली, असा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला. यावर वसुली करण्याचे संबंधित लाभार्थींना बजावल्याची माहिती बीडीओ पल्लवी वाडेकर यांनी दिली. यासोबतच दोषींवर कारवाई केल्याचेसुद्धा त्यांनी सभागृहात सांगितले.
ग्रामीण भागातील गोरगरिबांना शासनाच्या विविध घरकुल योजनांतून लाभ दिला जातो. मात्र, अनेकांना घरकुलाचा हप्ता मिळाला नाही. पंडित दीनदयाल योजनेतून जागा खरेदीसाठी अनुदान मिळत नाही, सोबतच लाभार्थींचे प्रवर्गसुद्धा बदलले आहेत आदी मुद्द्यांवर बळवंत वानखडे, बबलू देशमुख, रवींद्र मुंदे, बाळासाहेब हिंगणीकर, सुहासिनी ढेपे, सुनील डिके, महेंद्रसिंह गैलवार यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावर प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी प्रशासनाची बाजू मांडली. घरकुलांचे काम योग्य व नियमानुसार चालू असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.