अभियांत्रिकीच्या मृणालने बनविली ‘सोलर’ची तीनचाकी सायकल
By admin | Published: March 30, 2015 12:03 AM2015-03-30T00:03:59+5:302015-03-30T00:03:59+5:30
आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण, जिद्द मात्र काही तरी वेगळे करून दाखविण्याची.
नितीन टाले कावली (वसाड)
आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण, जिद्द मात्र काही तरी वेगळे करून दाखविण्याची. याच जिद्दीने ती कावलीसारख्या अत्यंत लहान गावातून विद्यानगरी धामणगावात शिक्षणाकरिता आली आणि मेकॅनिकल अभियंत्याचे शिक्षण घेत असतानाच तिने कल्पकतेचा वापर करून सोलरवरील आगळी-वेगळी सायकल तयार केली. ती या सायकलनेच महाविद्यालयात जाते. लोक तिच्याकडे आश्चर्याने बघतात. तिची ही आगळी निर्मिती अपंगांसाठी फारच फायदेशिर ठरणार आहे.
ही यशोगाथा आहे कावली वसाड येथील मृणाल मारोतराव साळवण हिची. तब्बल चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तिच्या पदरी हे यश पडले आहे. पारंपारिक लोहार कुटुंबातून आलेली मृणाल हे यश ऐरणीच्या देवाला अर्पण करते. सोलरवर तयार केलेल्या तीन चाकी सायकलीवरून ती शहरात फिरते. महाविद्यालयातही जाते.यामुळे तिच्यावर कौतुकमिश्रीत थाप पडते. मृणाल ही धामणगाव येथील लक्ष्मीनारायण अग्रवाल पॉलिटेक्निक महाविद्यालयात मॅकेनिकल अभियंता या शिक्षणक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकते. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून पढतमुर्ख होण्याची मृणालची इच्छा नाही. किंवा पिढ्यान् पिढ्या नशिबी आलेल्या कमकुवत आर्थिक स्थितीमध्ये खितपत पडण्याचीही तिची तयारी नाही. परिस्थिती पालटण्यासाठी स्वत: कष्ट आणि जिद्दीने पुढे जाण्याचा तिचा संकल्प आहे. तिने तिच्या कर्तृत्वातून हे सिध्द देखील केले आहे.
अशी आहे सोलर सायकल
बारा व्हॉल्टच्या दोन सोलर प्लेट, हब मोटर, यावर ही तीन चाकी सोलर उर्जेची सायकल तयार केली़ आॅटोप्रमाणे हॉर्न, लाईट, चालू-बंद करण्याचे बटण आहे. तसेच ही सायकल अधीक वेगाने नेण्यासाठी गेअर बसविण्यात आले आहे़त
चारही बहिणी भावी अभियंता
मृणालला तिन्ही बहिणी असून मोठी पूजा ही इलेक्ट्रॉनीक विभागाला याच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला शिकत आहे़ तर रसिका ही संगणक विभागात शेवटच्या वर्षाला आहे़ तर वैष्णवी ही दुसऱ्या वर्षाच्या इलेक्ट्रॉनीक विभागाला आहे़ चारही बहिणींनी विपरित आर्थिक स्थितीचा सामना करूनही यश संपादन करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवले आहे.