कुलू-मनालीमध्ये थंडीपासून बचावण्यासाठी केरोसिनच्या शेगडीशेजारी झोपला; अमरावती जिल्ह्यातील सैनिक शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 03:53 PM2020-12-24T15:53:36+5:302020-12-24T16:37:47+5:30
Indian Army : आवश्यक सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने व त्यानंतर सैन्याच्या वाहनातून त्यांच्या गावी नेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली.
अमरावती : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा कैलास कालू दहिकर (२७) या १५ बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत जवानाचा कुलू-मनाली परिसरातील पॉईंटवर कर्तव्यावर असताना आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी व आप्तपरिवार आहे. २३ डिसेंबरच्या रात्री हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे कैलास दहिकर यांनी कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी केरोसिनवर चालणारी शेगडी (हिटर) लावली होती. ते झोपेत असताना आग लागून होरपळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आवश्यक सोपस्कार आटोपून येत्या दोन दिवसांत त्यांचे पार्थिव नागपूर येथे विमानाने व त्यानंतर सैन्याच्या वाहनातून त्यांच्या गावी नेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे यांनी दिली.