काही संचालक पुण्यात, काहींचे ‘देवाचिये द्वारी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:11 AM2021-04-06T04:11:58+5:302021-04-06T04:11:58+5:30
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक गेले तरी कुठे, यावर परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांसह तालुक्याच्या ग्रामीण भागात ...
परतवाडा : अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक गेले तरी कुठे, यावर परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांसह तालुक्याच्या ग्रामीण भागात खमंग चर्चा सुरू आहे. काही जण पुण्यात राजकीय आश्रयाला, तर काही जण ‘देवाचिये द्वारी’ लोटांगण घालत असल्याची माहिती आहे. दरम्यान, ‘लोकमत’च्या वृत्ताने येथील सहकारक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अचलपूर न्यायालयात जवळपास सर्वच संचालकांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असताना, आठ अर्ज दाखल झाल्याची खात्रीशीर माहिती आहे.
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे नोकरभरती प्रकरण ठाण्यात पोहोचले. बाजार समितीच्या तिघांसह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. पैकी दोघांची तुुरुंगवारीदेखील झाली. यादरम्यान १ एप्रिल रोजी बाजार समितीचे संचालक शहरातून बेपत्ता झाल्याने नागरिकांसाठी तो विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे. आता आपल्याविरुद्धही गुन्हा दाखल होऊन अटक होणार, या भीतीने अवघे संचालक मंडळ फुर्रऽऽ झाले आहे. दोन वर्षांपूर्वी सहकारी संचालकांना झालेली अटक हा पाठीशी असलेला अनुभव पाहता, संचालकांनी अटकपूर्व अंतरिम जामिनासाठी धडपड चालविली आहे.
-----------
मोबाईल ‘स्विच ऑफ’
अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अचानक १ एप्रिल रोजी भूकंप झाला आणि संचालक मंडळ मिळेल त्या दिशेने पळत सुटले. चार दिवसांपासून अनेकांची त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे मोबाईल ‘स्विच ऑफ’ आहेत.
-----------------
मंगेश, शैलेश हाजीर हो !
अचलपूर बाजार समितीमध्ये सहायक सचिव असलेला मंगेश भेटाळू, शिपाई शैलेश शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अटकपूर्व जामीन मिळविला. न्यायालयीन निर्देशानुसार रविवारी नेहमीप्रमाणे त्यांनी ठाण्यात हजेरी लावली. दुसरीकडे पोलीस ठाण्यातून अटकेच्या कुठल्याही हालचाली नसताना, स्वत:हून ते संचालक अटकेच्या भीतीने पसार झाले आहेत.
बॉक्स
आठ संचालकांचा अर्ज दाखल
अचलपूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी वेगवेगळ्या वकिलांमार्फत १७ पैकी आठ संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावर न्यायालयातर्फे सुनावणीची तारीख मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे एका अभियोक्ताने ‘लोकमत’ला सांगितले.
------------