कुणाला हवे घरकुल, कुणी म्हणतं पाणी द्या; प्रशासकीय यंत्रणेची मेळघाटात वारी
By जितेंद्र दखने | Published: July 18, 2024 10:44 PM2024-07-18T22:44:17+5:302024-07-18T22:46:09+5:30
जिल्हाधिकाऱ्यासह एचओडी पोहोचले आदिवासीच्या दारी
जितेंद्र दखने, अमरावती: कुणाला घरकुल नाही भेटले, तर कुणी म्हणतं पिण्यासाठी पाणी नाही. योजनांचा लाभ भेटत नसल्याची व्यथा मेळघाटातील आदिवासींनी मांडली. या बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या दारी गुरुवारी पोहोचली. यानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वत: थेट चिखलदरा व धारणी तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रत्यक्ष आदिवासी बांधवांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
मेळघाटमध्ये विविध समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात. तरीही महत्त्वाचे प्रश्न, समस्या, आदिवासी बांधवाच्या अडचणी तसेच राहून जातात. त्यामुळे मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि सीईओ संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम १८ जुलै रोजी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील जनतेच्या आदी हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी मेळघाटातील विविध गावात पोहोचले. चिखलदरा तालुक्यात कोहाना गावात जिल्हाधिकारी साैरभ कटियार व अधिकाऱ्यांची चमू पोहोचली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके, डीएचओ डॉ. सुरेश असोले उपस्थित होते. जिल्हाधिकारी थेट अंगणवाडी केंद्रात पोहोचले अन् तेथील आहाराबाबतची माहिती जाणून घेतली. याशिवाय रेशन दुकान जाऊन धान्य वितरण व्यवस्था चौकशी केली. सोबत ग्रामस्थासोबत संवाद साधून आदिवासी बांधवांच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधान झाले.