वाह रे जावई, ना फ्लॅट दिला ना दिला मुलीच्या लग्नाचा खर्च !
By प्रदीप भाकरे | Published: April 27, 2023 01:41 PM2023-04-27T13:41:13+5:302023-04-27T13:44:21+5:30
आमिष दाखवून वारंवार अतिप्रसंग: राजापेठमध्ये नोंद; बाळापुरमध्ये वर्ग
अमरावती : तुला फ्लॅट घेऊन देतो, तुझ्या मुलीच्या लग्नाचा खर्च देखील उचलतो, असे आमिष देऊन जावयानेच आपले वारंवार शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक तक्रार साळीने केली आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय पिडित विवाहितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी २६ एप्रिल रोजी रात्री रामदास पी.टी. (७०, साईनगर, अमरावती) याच्याविरुद्ध बलात्कार व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तथापि, घटनास्थळ बाळापूर असल्याने तो गुन्हा त्या पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सन १९९२ ते सन २०२० दरम्यान तब्बल २८ वर्षे पिडित महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. तक्रारीनुसार, आरोपी रामदास हा पिडित महिलेचा सख्खा जावई आहे. ती उपवर असताना जावई रामदासने तिला प्रेमजाळात ओढले. एका लग्न समारंभात एकत्र आल्यानंतर बाळापुरला आरोपीने तिच्या मनाविरूध्द तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान त्यानंतर त्याने तिला चांगल्या ठिकाणी लग्न लावून देण्याचे आमिष दिले. वयानुरूप तिचे लग्न झाले. मात्र त्यानंतरही आरोपी रामदासने तिला पुणे वा अन्य ठिकाणी फ्लॅट घेऊन देण्याची बतावणी केली.
दरम्यान आता ५० ते ५२ वर्षे वय असलेल्या पिडिताला एक मुलगा, मुलगी देखील आहे. आता तुझ्या मुलीचे लग्न लावून देतो, तिच्या लग्नाचा संपुर्ण खर्च देखील करतो, तुला चांगले घर बांधून देतो, टू बीएचके फ्लॅट घेऊन देतो, अशी वारंवार बतावणी केली. मात्र, त्याने एकही आश्वासन पुर्ण केले नाही. तो केवळ प्रलोभने देत महिलेची फसवणूक करीत राहिला. प्रत्येक वेळी तो तिच्या भावनेशी खेळत राहिला.
जीवे मारण्याची धमकी
पिडित महिलेने जावयाचा प्रत्येकवेळी जोरकस प्रतिकार केला. मात्र त्याने तो प्रतिकार वारंवार मोडित काढला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तथा तिला शिविगाळ देखील केली. एकंदरित जावयाने प्रलोभने देऊन केवळ आपले शोषण केले. पाणी डोक्यावरून गेल्याने अखेर पिडित महिलेने बुधवारी दुपारी पुण्याहून अमरावती गाठले. आरोपी हा राजापेठ हद्दीतील रहिवाशी असल्याने पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली.
पिडित महिला पुण्याची रहिवाशी आहे. तक्रार नोंदवून घेऊन गुन्हा दाखल केला. मात्र घटनास्थळ बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने गुन्हा त्या पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
- मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ