सासुरवाडीत येऊन जावयाने सासुला यमसदनी धाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 10:04 AM2022-01-30T10:04:53+5:302022-01-30T11:18:05+5:30
दिनेश हा सासूच्या घरात शिरला. त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. तो वाद कानी येताच सासूने जावयाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आजारी सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
अमरावती : जावयाने सासरवाडीत येऊन सासू व पत्नीवर क्षुल्लक कारणांवरून कुऱ्हाडीने हल्ला चढविला. यात सासूचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर पत्नी गंभीररीत्या जखमी झाली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा येथे २८ जानेवारी रोजी भरदुपारी हा खुनी थरार घडला. पद्मा ऊर्फ रुक्माबाई विनायकराव इंगळे (४५, रा. टाकरखेडा पूर्णा) असे मृताचे नाव आहे. तर स्नेहल दिनेश बोरखडे (२५) असे जखमीचे नाव आहे.
आई आजारी असल्याने स्नेहल ही आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दाीतील टाकरखेडा पूर्णा येथे आठ दिवसांपासून माहेरी आली होती. तर स्नेहलचा पती दिनेश भानुदास बोरखडे (३०, रा. पेठ इतबारपूर, ता. दर्यापूर) हा शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास टाकरखेडा पूर्णा येथे आला. दुपारची वेळ असल्याने मोहल्ला सामसूम होता. दिनेश हा सासूच्या घरात शिरला. त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. तो वाद कानी येताच सासूने जावयाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आजारी सासूवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात सासू पद्मा ऊर्फ रुक्माबाई यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर पत्नी स्नेहल हिच्या डोक्यावर देखील कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला.
यादरम्यान आरडाओरडा केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. आरोपीची पत्नी स्नेहल दिनेश बोरखडे हिने आसेगाव पुर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आसेगाव पूर्णा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
नातेवाईकांचा ठाण्यात ठिय्या
आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला. आरोपी परत येऊन हल्ला करेल, अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली. आरोपीच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शविली. पोलीस उपविभागीय अधिकारी सूर्यकांत जगदाळे व ठाणेदार किशोर तावडे यांनी घटनास्थळी भेट दिली.
आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे. आरोपीला तत्काळ अटक करण्यात येईल. घरगुती कारणातून मध्यस्थी करण्यास गेलेल्या सासूवर जावयाने कुऱ्हाडीने हल्ला केला.
किशोर तावडे, ठाणेदार, आसेगाव पुर्णा