सोनवणेला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:00 AM2020-03-05T06:00:00+5:302020-03-05T06:00:29+5:30
निलंबित करण्यात आल्यानंतर आता अटकेत असलेला दत्तापूर-धामणगावचा तत्कालीन ठाणेदार रवींद्र सोनवणे याला मंगळवारी उशिरा रात्री अमरावती येथून ताब्यात घेतले. मध्यरात्री चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. त्याने तेथे रात्र काढली. कोठडीत रात्र काढताना सोनवणे ढसाढसा रडत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सोनवणेला न्यायालयीन कोठडी
सेवासमाप्तीची कारवाई सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दत्तापूर येथील अल्पवयीन मुलीच्या हत्याप्रकरणात निलंबित व अटक केलेला ठाणेदार रवींद्र सोनवणे याला बुधवारी अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.ए. सिन्हा यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सोनवणे याला १७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. सोनवणेला न्यायालयात आणताना, नेताना पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
वाहन उपलब्ध होईपर्यंत सोनवणेला कौटुंबिक न्यायालयात लपवून ठेवण्यात आले होते.
राज्यघटनेच्या कलम ३११ नुसार चौकशीत दोषसिद्धी होऊन गुन्हा दाखल झाल्यामुळे सोनवणे याच्या
शासकीय सेवेच्या समाप्तीसाठीच्या हालचाली पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत.
कोठडीत ढसाढसा रडला आरोपी ठाणेदार
अल्पवयीन मुलीचे हत्याप्रकरण : पालकांनी व्यक्त केले समाधान
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : निलंबित करण्यात आल्यानंतर आता अटकेत असलेला दत्तापूर-धामणगावचा तत्कालीन ठाणेदार रवींद्र सोनवणे याला मंगळवारी उशिरा रात्री अमरावती येथून ताब्यात घेतले. मध्यरात्री चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले. त्याने तेथे रात्र काढली. कोठडीत रात्र काढताना सोनवणे ढसाढसा रडत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संरक्षण करण्याऐवजी तीन महिने सलगी साधून सतत अत्याचार करणारा दत्तापूर ठाण्याचा निलंबित पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणेच्या त्याच्याच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. शवविच्छेदन अहवालानंतर आढळलेल्या अनेक गंभीर बाबी व मोबाईल सीडीआर (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) वरून अल्पवयीन मुलीच्या मातापित्यांनी केलेल्या आरोपांना पुष्टी मिळाली. मुलीच्या हत्येला सोनवणेच जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप मुलीच्या पालकांचा आहे. पालकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ठाणेदारालाच अटक केल्यामुळे पालकांनी जिल्हा पोलीस प्रशसनावर विश्वास व्यक्त केला. तालुक्यात सोनवणेच्या अटकेचीच सर्वत्र चर्चा आहे.
विश्वास बळावला
उपविभागीय अधिकारी कविता फरतडे यांनी पारदर्शक तपास केला. जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी आणि आयजी मकरंद रानडे यांनी तटस्थ भूमिका घेतली. ठाणेदार रवींद्र सोनवणे याला आरोपी केले. या कारवाईने पोलीस प्रशासनावर सर्वसामान्यांचा विश्वास बळावला असल्याचे मत मुलीच्या जन्मदात्यांनी व्यक्त केले. पूर्वी ज्या ठाणेदारावर मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्याच ठाणेदाराने मुलीशी गैरकृत्य केले. त्याच खात्यातील इतर अधिकारी साथ देतील का, अशी शंका पालकांना होती. सोनवणेच्या अटकेने ती धुवून निघाली.