परिचारिका पसारच, पिंजरहून पोलीस रिक्त हस्ते परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:43+5:302021-06-24T04:10:43+5:30
अमरावती : रेमडेसिविर अपहार प्रकरणातील परिचारिका अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ती अकोला जिल्ह्यातील मूळ गावी पिंजर येथे असेल, ...
अमरावती : रेमडेसिविर अपहार प्रकरणातील परिचारिका अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ती अकोला जिल्ह्यातील मूळ गावी पिंजर येथे असेल, या शक्यतेने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सकाळी ते गाव गाठले. मात्र, ती आढळून आली नाही. स्थानिक प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून ती पसार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी तथा तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन मालुसरे याने न्यायालयात सर्मपण केले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याची पोलीस कोठडीही मिळविली. दोन दिवसांपूर्वी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याने पोलीस कोठडीदरम्यान दिलेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. दरम्यान, परिचारिकेला अटक झाल्यानंतर अनेक बाबींचा उलगडा होऊ शकेल, अशी शक्यता आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
असे आहे प्रकरण
रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू झाल्यानंतर गुन्हे शाखेने १२ मे रोजी डॉ. मालुसरेंसह कोविड रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टर अक्षय राठोड, शुभम सोनटक्के, शुभम किल्लेकर, अनिल पिंजरकर, विनित फुटाणे व एका परिचारिकेला अटक केली होती. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली. मालुसरेने आत्मसर्मपण केले, तर परिचारिका पसार आहे.