पाण्याअभावी सुकल्या संत्राबागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 01:40 AM2019-01-25T01:40:05+5:302019-01-25T01:40:58+5:30
गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट : गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत चालल्या आहेत.
शेतकऱ्यांना आपल्या शेतात बागा उभ्या करण्याकरिता वर्षोगनिती मेहनत करुन बागा उभ्या केल्या. जवळचा होता नव्हता पैसा खर्च केला. मेहनत पणाला लागली. मात्र, नजरसेमोर उभ्या असलेल्या संत्राबागा पाण्याअभावी सुकत चालल्यचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर थांबलेला नाही. हे अश्रू थांबविण्याकरिता आणि लाखमोलाच्या संत्राबागा वाचविण्याकरिता शहानूर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी वारंवार होते. या मागणीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
यावर्षी शहानूर धरण ७० टक्के भरल्याची नोंद दप्तरी होती. सद्यस्थितीत धरणामध्ये ६० टक्के जलसाठा आहे. यावर्षी पाण्याचा साठा कमी असल्यामुळे रब्बीसारखे येणारे गहू, हरभरा, कांदा या पिकाकरिता पाणी मिळणार नाही, असे शाखा अभियंत्याकडून सांगण्यात आले होते. त्यापूर्वी तुम्ही संत्रापिकांकरिता फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला संत्रापिकाला पाणी देण्याची व्यवस्था करू, असे सांगितले गेले. यामुळे संत्रा बागायतदारांनी दोन महिन्यांपूर्वी अर्जप्रक्रिया केली. मात्र, अद्यापपर्यंत शहानूर धरणाचे पाणी शेतीकरिता सोडण्यात आलेले नाही.
पथ्रोट परिसरात आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याकरिता शेतकरी ५ ते १० जानेवारीपासून आंबिया बहर घेण्याकरिता पाणी सोडतात. मात्र, विहिरीतच पाणी नसल्यामुळे संत्राबागांना ते अद्याप देता आलेले नाही. शहानूर धरणाच्या पाच सहा किलोमीटरच्या परिसरातील संत्राबागा सुकत आहे. धरणात पाणी आहे, मात्र त्याचा वापर शेतीसाठी करता येत नाही. शहानूर विभागाने पंधरा दिवसांतून एकवेळा धरणाचे पाणी सोडले, तर शेतकऱ्यांच्या संत्राबागा सुकण्यापासून वाचतील. शहानूर विभागाला या बाबीची दखल घेणे फार गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या या जटिल प्रश्नाकडे लक्ष देणे ही शासनाची नितांत गरज आहे. संत्राच्या बागांवर परिसरातील शेतकऱ्यांची भिस्त आहे. चिल्लर पिकांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती कष्ट वजा जाता काहीच शिल्लक राहत नाही. याशिवाय धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे शेतकºयांनी जास्त पाण्याची माया लागणारे गहू, कांदा, हरभऱ्याकडे यंदा दुर्लक्ष केले.
आमच्या उभ्या बागा पाण्याअभावी सुकत आहे. शाखा अभियंत्यांनी संत्रा पिकाला पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते अजूनही पूर्ण झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी पाणी मागणीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
- श्रीकांत बोबडे
शेतकरी
शहानूर विभागाने महिन्यातून दोन वेळा पाणी सोडले, तर आमच्या बागा वाचविण्यास मदत होईल. शासनाने आमच्या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
- गजानन काळमेघ
शेतकरी
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. शेतकरी व जवान या दोघांवर देशाचे भवितव्य आहे. मात्र, ‘सीमा पर मरे जवान, देश में किसान’ देशात सध्या ही परिस्थिती आहे.
- रामेश्वर नागापुरे
शेतकरी