‘सोफिया’मुळे पेयजल बाधित
By admin | Published: March 29, 2016 12:02 AM2016-03-29T00:02:15+5:302016-03-29T00:02:15+5:30
१२ लाखांहून अधिक लोकसंख्येचे पिण्याचे पाणी आणि ५८ हजार एकर सिंचनाचे पाणी पळविणाऱ्या सोफियाची मग्रुरी दिवसेंदिवस वाढतच आहे.
२० हजार लोकांचे आरोग्य धोक्यात : पाणी दूषित असल्याचा अहवाल
अमरावती : १२ लाखांहून अधिक लोकसंख्येचे पिण्याचे पाणी आणि ५८ हजार एकर सिंचनाचे पाणी पळविणाऱ्या सोफियाची मग्रुरी दिवसेंदिवस वाढतच आहे. सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पांतील रसायनयुक्त पाणी पेयजल स्त्रोतात मिसळत असल्याने २० हजार लोकसंख्येपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कागदोपत्री सामाजिक सहृदयता जोपासणाऱ्या सोफियाचा खरा चेहरा दिवसाआड जनतेसमोर येत आहे. सुमारे २,६५० मेगावॅटच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील घातक रसायनयुक्त पाणी वाघोलीनजीकच्या नाल्यात सोडले जाते. याशिवाय यावले यांच्या शेतातून सांडपाणी सोडल्याने वाघोलीसह नजीकच्या सालोरा व माहुली जहांगीर येथील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रभावित झाले आहेत. सोफियामधील प्रदूषित पाणी नाल्यांव्दारे वाघोलीनजीकच्या पाझर तलावात पोहोचते. पाझर तलावाचा सांडवा पुढे नाल्याला मिळतो. याच नाल्यानजीक असलेल्या विहिरीवरुन तीनही गावांना पाणीपुरवठा होतो.
वेस्टेज पाण्यात घातक रसायने
अमरावती : येथील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेने दिला आहे. सोफियातून निघणाऱ्या पाण्यात इतकी घातक रसायने आहेत की पाझर तलावातील बेशरम व अन्य झाडे त्यामुळे सुकून गेली आहेत. पिण्याचे पाणी अयोग्य असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने सोफिया प्रकल्पाचा दुष्परिणामही जनतेसमोर आला आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान यासंदर्भात रतन इंडियातील अधिकारी कर्नल लोकेश सिंग यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. याशिवाय प्रसिध्दी अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
धनदांडग्यांच्या सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्प व्यवस्थापनाने दंडेलशाहीचे अस्त्र उगारले असतानाही शासकीय यंत्रणा गप्पगार का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस सोफियाचे अधिकारी जिल्हा प्रशासनालाही जुमेनासे झाले आहेत. आपले कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, अशा तोऱ्यात सोफियाचे संबंधित अधिकारी खुलेआमपणे बोलतात. थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच या यंत्रणेशी दोन हात करावे लागतात. यावरूनही सोफियाची दंडेली लक्षात येऊ शकते.
५८ हजार एकर सिंचनाचे पाणी तत्कालीन शासनाने औष्णिक विद्युत प्रकल्पाला दिले, करारही केला. मात्र त्या कराराला सोफियाने आव्हान दिले .
काय म्हणतो अहवाल ?
माहुली जहांगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २६ फेब्रुवारी २०१६ मध्ये वाघोली येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील स्टँड पोस्टच्या पाण्याचा नमुना घेतला. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने तपासणीनंतर वाघोली येथील पाणी पिण्यास अयोग्य ठरविले. तसा अहवालच १६ मार्च रोजी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला.
साथरोगांचा संभाव्य धोका
वाघोली येथील पिण्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट करीत या पाणीस्त्रोताचे ‘सुपरक्लिरेशन’’ करून नियमित निर्जंतुकीकरण करावे, ब्लिचिंग पावडरचा वापर करावा, असे केल्यास साथरोगांचा संभाव्य धोका टाळता येईल, अशा सूचनासुध्दा ग्रामपंचायत सचिवांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे दिल्या आहेत.
सोफियातील सांडपाणी आणि प्रदूषणामुळे येथील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही, गलगंड आणि श्वसनाच्या आजारांचा गावात शिरकाव झाला आहे. कंपनीमधून सोडलेले पाणीच ग्रामस्थांना प्यावे लागते.
- राजू मनोहर,
ग्रामस्थ, वाघोली