सोफियाची पाईपलाईन फुटली, पिंपळखुटा जलमय
By Admin | Published: February 4, 2015 11:05 PM2015-02-04T23:05:12+5:302015-02-04T23:05:12+5:30
सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्यामुळे नजीकच्या पिंपळखुटा (मोठा) या गावात पाणी शिरले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. उर्दू शाळेत पाणी शिरल्याने
अनर्थ टळला : शाळा, शेतीची मोठी हानी
मोर्शी/तळणी : सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्यामुळे नजीकच्या पिंपळखुटा (मोठा) या गावात पाणी शिरले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. उर्दू शाळेत पाणी शिरल्याने शाळेला सुटी देण्यात आली. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे शेतातील पिकांचीही मोठी हानी झाली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोफियाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
नांदगाव पेठ येथील इंडीया बूल कंपनीच्या सोफीया औष्णीक वीज प्रकल्पाकरिता येथील अप्पर वर्धा धरणातून १२०० मी.मि. व्यासाची ३१ किलोमिटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पिंपळखुटा मोठा या गावानजीकच्या जमिनीखालून ही जलवाहिनी गेली आहे. जलवाहिनीचे संभाव्य धोके ओळखून गावकऱ्यांनी त्यावेळी या जलवाहिनीला विरोध दर्शविला होता. तथापि कंपनीने गावकऱ्यांच्या रोषाला न जुमानता जलवाहिनीचे काम पूर्ण केले.
सोफियाविरोधात रोष उफाळला
बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जि.प. उर्दू शाळेच्या भिंतीशेजारुन गेलेली ही जलवाहिनी अचानक फुटल्यामुळे प्रचंड दाबाने पाण्याचे फवारे उडाले. त्यामुळे पिंपळखुटा गावात पाणी शिरले. जि.प. उर्दू शाळा आणि विवेकानंद विद्यामंदिराच्या आवारात व वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले. यामुळे विद्यार्थी,शिक्षकांची तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांनी शाळेतून पळ काढला. शिक्षकांनी सावधगिरी२ बाळगून शाळेला सुटी दिली.
शाळेच्या भांडारगृहातील साहित्य देखील भिजले. जलवाहिनीचे पाणी धो-धो वाहात होते. गावात गोंधळ उडाला. मिळेल त्या साहित्याने पाणी नाल्यात सोडण्यचा प्रयत्न गावकरी करीत होते. त्यात त्यांना बरेचसे यशही आले.
हा प्रकार सुरु असताना गावातील नागरिक गजानन चरपे, पोलीस पाटील निकम यांनी सोफियाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी अप्पर वर्धा धरणातून सोडण्यात आलेले पाणी थांबविण्याच्या सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिल्या. परंतु तोवर बरीच हानी झाली होती.
सिमेंटरस्ताही वाहून गेला
२७ मिटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बुधवारपासून सुरु झाले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हा रस्ता पूर्णत: वाहून गेला. गावातील डांबरी रस्त्यावरुन पाण्याचा प्रचंड प्रवाह वाहत गेल्यामुळे रस्ता खरडला गेला तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला.
गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !
एक महिन्यापूर्वी गावाशेजारुन वाहत असलेल्या नाल्याशेजारी हिच जलवाहिनी फुटली होती. हीच घटना रात्रीला घडली असती तर मोठी जिवीत आणि वित्तहानी घडू शकली असती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
सोफिया देणार नुकसान भरपाई
घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना मिळताच त्यांनी तहसीलदार माळवी आणि त्यांच्या अधिनस्थ महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने रवाना केले. त्यांनी सोफीयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीमार्फत करण्याच्या सूचना दिल्या. आमदार अनिल बोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.