जडीबुटी देता फिरभी नहीं जमा तो दवाखाने भेजता, मांत्रिकांच्या कार्यशाळेत पुढे आले वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:57 PM2023-03-29T14:57:46+5:302023-03-29T14:58:10+5:30
डॉक्टर म्हणाले, ‘मिलके जान बचायेंगे’
नरेंद्र जावरे
चुरणी (मेळघाट) : ‘गाव का मरीज आया उसका नाडी पकडता, फिर बेमारी का पता लगता, उस्पे से मंतर के पाणी पिला. पास का जडीबुटी और फिर नहीं जमा तो दवाखाने में भेजता...’ कुपोषणाचा कलंक असलेल्या मेळघाटात मंगळवारी चिखलदरा व चुरणी येथे आयोजित कार्यशाळेत मांत्रिकांनी (भूमका) आपले अनुभव कथन केले.
आरोग्य विभागाच्या वतीने प्रथमच मेळघाटातील आदिवासी रुग्णांना दवाखान्यात पाठविण्यासाठी भूमकांची मदत घेतली जात आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. दोन्ही ठिकाणी दीडशेच्या जवळपास मांत्रिक उपस्थित होते. जिल्हा आरोग्याधिकारी दिलीप रणमले काटकुमच्या आरोग्याधिकारी रागेश्री माहुलकर, डॉ. अंकित राठोड, डॉ. अंकुश देशमुख, सरपंच नारायण चिमोटे, नानकराम ठाकरे, गणेश राठोड, हरी येवले, अभ्यंकर उपस्थित होते. अठराविश्व दारिद्र्यात असलेला मेळघाटातील आदिवासी आजारपणात आजही भूमकाकडेच जातो. परिणामी उपचाराअभावी अनेकांना जिवाला मुकावे लागते. त्यांना वाचविण्यासाठी शेकडो योजना आणि कोट्यवधींचा खर्च करूनही स्थिती ‘जैसे थे’च असल्याने आरोग्य यंत्रणेवर सडकून टीका केली जाते. मेळघाटात पहिल्यांदाच भूमकांना रुग्णालयात पाठविल्यावर शंभर रुपये मानधन दिले जाणार आहे, हे विशेष.
सर्पदंश, अतिसार अन् मंतरलेले पाणी
आरोग्य विभागाच्या वतीने या कार्यशाळेत भूमकांना ‘कुठल्या कुठल्या आजारावर तुम्ही उपचार करता?’ असे विचारले असता त्यांनी पोटफुगी, सर्पदंश, अतिसार, चक्कर येऊन पडणे, बडबडणे, आदी सांगितले. त्यावर हे कशाने होते आणि त्यासाठी काय करता, याबाबत विचारणा केली असता जडीबुटी, मंतरलेले पाणी आणि उपचार अशी पद्धत त्यांनी कथन केली.
आरोग्य यंत्रणेला सतत आमचे सहकार्यच आहे. जीव वाचविण्यासाठी सर्वप्रथम आदिवासी आमच्याच दारी येतात. आमच्याकडून झालेला उपचार आरोग्य विभागाच्या सहकार्याने करून रुग्णांना आम्ही आरोग्य केंद्रातच पाठवू, अशी ग्वाही हात उंचावून उपस्थित भूमकांनी दिली.