बीजोत्पादनासाठी १५ जानेवारीपर्यंत करा सोयाबीनची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:10 AM2021-01-04T04:10:59+5:302021-01-04T04:10:59+5:30
अमरावती : खरीप हंगामात काढणीच्या काळात झालेल्या पावसामुळे सोयाबीनची प्रतवारी खराब झालेली असल्याने घरचे बियाणे पुढच्या हंगामात वापरासाठी जतन ...
अमरावती : खरीप हंगामात काढणीच्या काळात झालेल्या पावसामुळे सोयाबीनची प्रतवारी खराब झालेली असल्याने घरचे बियाणे पुढच्या हंगामात वापरासाठी जतन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. याशिवाय संरक्षित सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी १५ जानेवारीपर्यंत अर्धा ते एक एकरापर्यंत सोयाबीनची पेरणी करता येईल, उत्पन्न थोडे कमी होईल, परंतु घरचे सुरक्षित बियाणे उपलब्ध होईल, असे कृषी विभागाने सांगितले.
बीजोत्पादनासाठी क्षेत्राची चांगली देखभाल ठेवल्यास खरिपाच्या किमान ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन व चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊ शकते. याद्वारे स्वत:ची व गावातील काही शेतकऱ्यांच्या चांगल्या बियाण्याची गरज भागू शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले. मराठवाडा कृषी विद्यापीठाने उन्हाळी सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या उन्हाळी सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमतादेखील चांगली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे खरीप हंगामात एकरी २२ ते २५ किलोच बियाणे लागणार आहे व याद्वारे उत्पादन खर्चात बचत होणार आहे.
यंदा सोयाबीन उगवणविषयी मोठ्या प्रमाणात खासगी बियाणे कंपन्यांच्या तक्रारी झाल्या आहेत. यावर्षीदेखील पावसाने सोयाबीनची प्रतवारी खराब झालेली आहे. त्यामुळे बियाणे कंपन्यांद्वारे कमी प्रमाणात बियाणे विक्रीला उपलब्ध राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई राहील. शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरणीसाठी जतन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बॉक्स
सोयाबीन बियाण्यास ज्वार लागवडीचा पर्याय
सोयाबीन पिकास सुधारित ज्वारीची लागवड हा चांगला पर्याय आहे. पुढील खरीप हंगामामध्ये उशिरा पक्व होणाऱ्या ज्वारीच्या सुधारित वाणाची पेरणी करावी. ज्वारीचे बाजारभाव व कडब्याची किंमत पाहिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. प्रत्येक गावात सामूहिक स्वरूपात पेरणी झाल्यास वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करता येऊ शकते, बाजारामध्ये नायलाॅन दोरीच्या जाळ्या मिळतात. सामूहिकपणे अशा जाळ्या शेताभोवती लावल्यास वन्यप्राण्यांपासून शेताचे रक्षण करता येऊ शकत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.