५५ हजार हेक्टर क्षेत्राला पेरणीची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:44 AM2019-06-21T01:44:11+5:302019-06-21T01:44:49+5:30
हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीकपेरणी अडगळीला गेली आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी दिली. लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : हमखास पडणाऱ्या मोसमी पावसाचे मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मूग आणि उडीद पीकपेरणी अडगळीला गेली आहे. पहिल्याच नक्षत्रात पावसाने दडी दिली. लांबलेल्या पेरणीमुळे बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अशा स्थितीत उत्पादकांच्या आशा आता शनिवारी सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे यंदा ७ लाख २८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. यात तालुक्यात सुमारे ५५ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाचे आगमन झालेले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी काही तालुक्यांत पावसाचे आगमन झाले. मात्र, त्यानंतर थेंबही कोसळला नाही. १९७२ नंतर पहिल्यांदा असे दुष्काळाचे चित्र पाहावयास मिळाल्याचे वडीलधारी मंडळी सांगतात. एकीकडे हवामान खात्याने यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज वर्तविला. असे असताना ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्रात पावसाने पाठ फिरविली. पावसाळ्यातील पहिलेच वाहन उंदीर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण, पहिले वाहन तसेच नक्षत्राने शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने मूग आणि उडीद पीक येण्याची कमीच शक्यता आहे.
पेरणीचा कालावधी निघून गेल्याने मूग आणि उडिदाप्रमाणे कापूस उत्पादक चिंताक्रांत झाला आहे. कारण लवकर लागवड केल्यास कापसाचे अपेक्षित उत्पादन निघते. जसजसा कापूस लागवडीला उशीर होत जाईल, तसतसे कापसाचे उत्पादन घटत जाण्याची शक्यता आहे. कारण हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. म्हणून उत्पादकांच्या आशा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत. या नक्षत्रात हत्ती वाहन असल्याने अधिक पावसाचा अंदाज बांधला जात आहे. जर या चरणात चांगला पाऊस झाला, तर ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या पुनर्वसु नक्षत्रात पिके लहान असल्यामुळे मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज भासेल. पुष्य २० जुलैपासून आणि ३ आॅगस्टला आश्लेषा नक्षत्रास सुरुवात होणार आहे. यानंतर मघा नक्षत्रात पावसाची शक्यता कमीच असते.
पंचक्रोशीतील शेतकरी हवालदिल
अंजनगाव बारी : यावर्षी पाऊ स मृग नक्षत्रात येणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, मृग नक्षत्राला १० दिवस झाल्यानंतरही अद्याप पाण्याच्या थेंबाकरिता शेतकऱ्यांनी डोळे आकाशाकडे लावले आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. गार वारा सुटतो. हे पाहता पाऊ स येणार, पेरणी होणार असे शेतकरी मनोमन पक्के करतो. मात्र, पावसाने अद्याप हुलकावणी दिलेली आहे.
अंजनगाव परिसरात शेतीच्या मशागतीची कामे, नांगरणी, वखरणी, फण-पºहाट्या वेचणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. जमीन तापली असल्याने मृग नक्षत्रातील दोन ते तीन पाणी जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत ती शांत होत नसल्याने शेतकरी पेरणीला सुरुवात करीत नाही. परिसरात पेरणीकरिता ८० टक्के जमिनी तयार असून, २० टक्केच जमिनीचे मशागतीचे काम सुरू आहे. तेही आता संपुष्टात येत आहे.
वरुणराजा निद्राधीन
पावसाअभावी कृषिसेवा केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी दिसत नाही. तेथे सध्या शुकशुकाट आहे. कृषिसेवा केंद्र विक्रेत्यांनी सर्व प्रकारची खते, बियाणे, औषधी आणुन शेतकºयांना उपलब्ध करून दिली. मात्र, वरुणराजाची झोप जोवर उघडणार नाही, तोपर्यंत कृषिसेवा केंद्र विक्रेत्यांनाही गुतविलेली रक्कम मिळविता येणार नाही.
बियाण्याचे दर वधारले
पावसाची हुलकावणी पाहता, यंदा कपाशी, सोयाबीन या पिकांचा पेरा सर्वाधिक राहणार आहे. तूर, मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी, तीळ ही पिके कमी प्रमाणात पेरली जातील. यावर्षी बियाण्याचे दर कमालीचे वधारल्याने पाऊस चांगला झाल्यास पेरणी करणार, नाही तर शेती पेरणार नाही, असे शेतकºयांनी म्हटले आहे. जून आतापर्यंत कोरडा गेला असून, जुलैच्या १५ तारखेनंतर पेरणी झाल्यास काहीच हाती लागणार नाही, अशी भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे.