मनाईहुकूम झुगारून खासदारांची मेळघाटात ‘पेरणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:03 PM2019-07-08T23:03:00+5:302019-07-08T23:03:51+5:30
खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी दिवसभर मेळघाटातील २० पेक्षा अधिक गावांचा दौरा केला. व्याघ्र प्रकल्पाच्या संबंधित आदिवासींच्या सर्व अडचणी ऐकून जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यात सेमाडोह येथे गुरांच्या चराईचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आदेश उपस्थित वनाधिकाऱ्यांना दिले. तेथीलच व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर पेरणी केली. मनाईहुकूम झुगारून खासदारांनी पेरणी केल्याने आदिवासी शेतकऱ्यांना बळ मिळाले. कावडाझिरी येथील वाघाच्या हल्ल्यात जखमी मुलीला सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला.
खासदार नवनीत राणा सोमवारी वन, व्याघ्र प्रकल्पांसह महसूल आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांना घेऊन धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध गावांत पोहोचल्या. वन आणि अन्य प्रकल्पासंदर्भात आदिवासींनी त्यांच्या समस्या राणा यांच्यासमोर मांडल्या. मांडल्या. आदिवासींसाठी अडचण ठरणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी दिल्ली येथे वरिष्ठ अधिकाºयांची बैठकीत आवाज उचलण्याची ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आदिवासी गावांचे पुनर्वसन करण्यात आले. दहा लाख रुपये घ्या आणि कुठेही जा, या कायद्यातून आदिवासींचे जीवनमान कसे उंचावणार, असा सवाल त्यांनी केला. सेमाडोह येथील आदिवासींना तब्बल सात किलोमीटर दूर अंतरावर चराईसाठी जंगल देण्यात आले. इतक्या दूर अंतरावर चराई शक्य नाही, असे बजावत त्यांना लगतच चराईची सुविधा देण्याचे निेर्देश नवनीत राणा यांनी दिले.
धनादेश वाटप
गत आठवड्यात वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या संगीता राधेश्याम दावर या आठ वर्षीय चिमुकलीला सव्वा लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला. तेलंगणा येथील एका कंपनीत विद्युत धक्कयाने मरण पावलेल्या अचलपूर तालुक्यातील काळविट गावातील दिनेश संतू चाकोने (१९) यांच्या परिवाराला दोन लाख रुपये मदत रोख स्वरुपात दिली.
राणा आणि वाघिणीचे सात किलोमीटर अंतर
ब्रह्मपुरी येथून डोलार जंगलात सोडण्यात आलेल्या वाघिणीची दहशत परिसरात आहे. नवनीत राणा यांनी दौरा केला. तेव्हा ई-वन वाघीण केवळ सात किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती होती. त्यामुळे वनाधिकाऱ्यांची चांगली धावपळ झाली. सदर वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाने प्रयत्न सुरू केल्याचे सांगण्यात आले.
व्याघ्र आणि वन विभागासंदर्भात आदिवासींच्या समस्या निकाली काढण्यात येणार आहेत. काहींवर तोडगा काढण्यात आला. वाघिणीला ट्रॅप करण्यासाठी पाच दिवसापासून संबंधित विभाग कार्यरत आहे. दिल्ली येथे एक बैठक लावून उर्वरित समस्या निकाली काढण्यात येईल.
- नवनीत राणा
खासदार, अमरावती