सहा लाख हेक्टरांतील पेरण्या खोळंबल्या
By admin | Published: July 1, 2017 12:05 AM2017-07-01T00:05:31+5:302017-07-01T00:05:31+5:30
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली.
पावसाने पळविले तोंडचे पाणी : ३० हजार हेक्टरमध्ये दुबार पेरणीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली. मात्र, जिल्ह्यात मान्सूनचा दमदार पाऊस नसल्यामुळे किमान ३० ते ४० हजार हेक्टरमधील पेरण्यांना मोड येण्याची चिन्हे आहेत. दोन दिवसांत पाऊस न आल्यास ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे.
यंदाही पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. रोहिणी पाठोपाठ मृगनक्षत्रदेखील कोरडे गेले. आर्द्रावर शेतकऱ्यांची मदार असताना आठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या.
पावसाने हुलकावणी दिली. हवामान खात्याने मान्सून सक्रिय होणार असल्याचे सांगितले असले तरी जोवर १०० मिमी पाऊस होत नाही, तोवर पेरण्या करू नयेत, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ९७ हजार ३५५ हेक्टरमध्ये पेरण्या आटोपल्या. ही १३.४ टक्केवारी आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात ४९० हेक्टर, अचलपूर तालुक्यात दोन हजार १९२ हेक्टर, चांदूरबाजार तालुक्यात ७,७५५ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १४ हजार ८३४ हेक्टर, चांदूररेल्वे तालुक्यात ३३७ हेक्टर, तिवसा तालुक्यात ११ हजार ३७२ हेक्टर, मोर्शी तालुक्यात १९ हजार ९२ हेक्टर, वरूड तालुक्यात तीन हजार ५८८ हेक्टर,व दर्यापूर तालुक्यात दोन हजार ६८३ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली.
जिल्ह्यात जून महिन्यात किमान १४६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ९६.५ मिमी पाऊस पडला. प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची ६६.१ टक्केवारी आहे तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा ११.८ टक्केच पाऊस आहे. २४ तासांत जिल्ह्यात ५.६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २९.९ मिमी तिवसा तालुक्यात व १२.९ मिमी नांदगाव तालुक्यात पडला.
अशी झाली पिकनिहाय पेरणी
जिल्ह्यात सद्यस्थितीत ९७ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन ३१ हजार ७४७ हेक्टर, कापूस ३७ हजार २३३ हेक्टर, तूर १५ हजार ९० हेक्टर, धान ३ हजार ९१९ हेक्टर, ज्वार ४ हजार ४३५ हेक्टर, मका २ हजार ४७० हेक्टर, मूग १ हजार ५६७ हेक्टर, उडिद ५७० हेक्टर, भुईमूग ७४ हेक्टर व तिळाची ३७ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
मूग, उडदाचे क्षेत्र होणार बाद
पाऊस बेपत्ता असल्यामुळे खरिपातील अल्पावधीच्या म्हणजेच ६० दिवसांचा कालावधी असणारे मूग व उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पिके सोयाबीनच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पावसाची दडी अधिक असल्यास ही पिके कपाशीच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता अधिक आहे.
विदर्भात तूर्तास
सार्वत्रिक पाऊस नाही
अमरावती : अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या उत्तम वाटचालीसाठी हवामानशास्त्रावर आधारित परिस्थिती योग्य आहे. परंतु अरबी समुद्रामधून ढगांचा प्रवाह कमी प्रमाणात होत असल्यामुळे पश्चिम विदर्भात अद्यापही मान्सूनची स्थिती कमकुवत असल्याचे मत हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते, सौराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वारे ४.५ किमी.उंचीवर आहेत. येथून मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर मध्यप्रदेश व उत्तर छत्तीसगड, उत्तर ओडिसाकडे ओढला जात असल्याने पावसाळी मेघ मोठ्या प्रमाणात उत्तरेकडे खेचले जात आहेत. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहात असून त्याच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात बरा पाऊस पडत आहे. पश्चिम विदर्भात विखुरलेला पाऊस पडत आहे.