परतीच्या पावसाने सोयाबीनची हानी
By admin | Published: September 28, 2016 12:12 AM2016-09-28T00:12:40+5:302016-09-28T00:12:40+5:30
जिल्ह्यातील खरीप क्षेत्राच्या किमान ४० टक्के क्षेत्रात असणारे सोयाबीनचे पीक हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत करपले.
चार दिवस तग धरू शकेल : कापणी, मळणी, साठवणूक व्यवस्थापन महत्त्वाचे
अमरावती : जिल्ह्यातील खरीप क्षेत्राच्या किमान ४० टक्के क्षेत्रात असणारे सोयाबीनचे पीक हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत करपले. मात्र, उर्वरित क्षेत्रात ते बहरदार आहे. ९० ते ११० दिवस या अल्प कालावधीचे सोयाबीन आता कापणीवर आले आहे. मात्र, आठ दिवसांपासून सतत परतीचा पाऊस सुरू आहे. अशा अवस्थेत आणखी फार तर चार दिवस सोयाबीन तग धरु शकते. नंतर मात्र शेंगांमधील दाणे अंकुरण्याचा धोका आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पेरणीपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पीक चांगले आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेत महिनाभर पावसाची दडी असल्याने सोयाबीन हातचे जाणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. किंबहुना हलक्या व मध्यम स्वरुपाच्या जमिनीत सोयाबीन पावसाअभावी खराब झाले. मात्र, मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस होत असल्याने उर्वरित क्षेत्रातील सोयाबीनच्या शेंगा भरण्यास पोषक वातावरण निर्माण झाले. मात्र, परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने सोयाबीनच्या शेंगांमधील दाणे अंकुरण्याची भीती निर्माण झाली आहे. अशाही स्थितीत आणखी तीन ते चार दिवस सोयाबीन तग धरु शकते. नंतर मात्र सोयाबीनला धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती कृषीशास्त्रज्ञ योेगेश इंगळे यांनी दिली.
अमरावती विभागातील सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या किंवा शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. कमी कालावधीच्या जाती जसे जेएस ९५६० व जेएस ९३०५ लवकरच कापणीवर येत आहे. शेंग परिपक्व झाल्यानंतर व शेंग फुटण्याआधी पीक कापणी होणे गरजेची ठरत आहे. यामध्ये विलंब झाल्यास शेंगा फुटून उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी, मळणी व साठवणूक करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
अशी करावी सोयाबीनची साठवणूक
कापणी व मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे उकळून चांगल्यारितीने साफ करून व सुकवून मगच साठवावे. बियाणे सुकविताना सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे. अधिक ओलावा, आर्द्रता असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्यांच्या प्रतिवर परिणाम होतो तसेच कीड लागण्याची शक्यता असते. साठवणूक करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १०-१२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. ३० किलोे प्रमाणे किंवा यापेक्षा अधिक प्रमाणात बियाणे पोत्यात भरावे. साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे. जेणेकरुन खालची ओल सोयाबीनला लागणार नाही. तसेच पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहील, अशा रितीने पोते ठेवावे. एकावर एक अशी पोत्याची थप्पी न लावता दोन पोत्यावर एक अशी पोत्याची थप्पी लावावी. त्याच बरोबर पाच पोत्यांपेक्षा जास्त पोत्यांची थप्पी लागू नये, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रमुख व कृषीशास्त्रज्ञ संजय साखरे, वनस्पती रोगशास्त्र योगेश इंगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
या अवस्थेत करावी कापणी
पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगाचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होतो, तेव्हा पीक कापणीस आले, असे समजावे. कापणीच्या वेळी दाण्यातील ओल्याव्याचे प्रमाण १५-१७ टक्के असावे, कापणी केल्यानंतर पीक शेतात किंवा खळ्यावर ४-५ दिवस सुकवायला ठेवावे तसेच काढलेल्या पिकांचे पावसापासून संरक्षण करावे. पावसाने भिजल्यास बियाण्यांची प्रत खराब होते. पीक सुकल्यानंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्या छोट्या गंज्या काडीने किंवा लाकडी दांड्याने ठोकून घ्यावयात. या क्रियेत बियाण्यास कमी मार लागल्यामुळे सोयाबीनचे फार कमी नुकसान होते.
आर्द्रतेचे प्रमाण १३ ते १५ टक्के असावे
सोयाबीनची मळणी करतांना दाण्यातील ओल्याव्याचे प्रमाण १३.१५ टक्के असावे आणि मळणी यंत्राच्या गती ३५०-४०० फेरे प्रतीमिनिट यादरम्यान असावी. जेणेकरुन बियाण्यास ईजा पोहोचणार नाही आणि उगवणशक्तीवर परिणामदेखील होणार नाही. गती अधिक असल्यास बियांची फूट अधिक होण्याची शक्यता असते.