सोयाबीनला झळाळी, ९७५०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:05 AM2021-08-02T04:05:59+5:302021-08-02T04:05:59+5:30
गजानन मोहोड / अमरावती : परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विकले. आता मागणी वाढल्याने शनिवारी ...
गजानन मोहोड / अमरावती : परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विकले. आता मागणी वाढल्याने शनिवारी (दि. ३१) ९,७५० रुपये क्विंटल भाव मिळाला. आतापर्यंतचा सर्वाधिक व हमीभागाच्या दुपटीवर असलेल्या या तेजीच्या भावाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न मिळता व्यापाऱ्यांना व काही मोठ्या शेतकऱ्यांना मिळत आहे.
चार महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. उत्पादन कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची वाढती मागणी असल्याने देशांतर्गत सोयाबीनचे भाव वधारले आहेत. गतवर्षी ऑगस्टनंतर सातत्याने झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरी सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही. पावसाने डागी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अगदी दोन ते तीन हजार रुपयांपासून सोयाबीन विकले; तर काहींनी पिकांत रोटाव्हेटर फिरविला होता.
‘एनसीडीएक्स’वर सोयाबीनच्या भावात सतत तेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढत आहे. याशिवाय प्लँटद्वाराही मागणी वाढत असल्यामुळे सोयाबीनच्या भावात दर आठवड्याला वाढ होत आहे. तेलाच्या भावातही मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. येथील बाजार समितीमध्ये सध्याही रोज ९०० ते एक हजार क्विंटलची आवक होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांजवळ सोयाबीन शिल्लक नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक होणारा माल कोणाचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
बाजारात यंदाचे सोयाबीन यायला अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. अशा परिस्थितीत दर आठवड्यात मागणी वाढत असल्याने पुढच्या आठवड्यात सोयाबीनचा भाव १० हजार रुपये ओलांडण्याची शक्यता आहे. किंबहुना काही जिल्ह्यांत १० हजारांवर भावाने सोयाबीनची विक्री झालेली आहे व हा भाव आजवरचा विक्रमी ठरलेला आहे.
बॉक्स
बाजार समित्यांमधील सोयाबीन कुणाचे ?
मागील वर्षी पावसाने सोयाबीन खराब झाल्यानंतर लगेच विकले आहे. जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरता कृषी विभागाच्या सरासरी उत्पादकतेनुसार अपेक्षित उत्पादन व जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये विक्री पाहता शेतकऱ्यांजवळील सोयाबीनही केव्हाच संपले आहे. अशाही परिस्थितीत रोज एक हजार क्विंटलची आवक नेमकी कोणाची, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.
बॉक्स
आंतराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी
तज्ज्ञांच्या मते ब्राझीलमधील सोयाबीन आल्यावर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव न पडता ते वधारले. पामतेलाचा मोठा निर्यातदार देश असलेल्या मलेशियात उत्पादनात फटका बसला. अर्जेंटिना व अमेरिकेच्या उत्पादनात कमी आल्याने साठे कमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चीनची आयात वाढली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दरात मोठी झालेली आहे.
बॉक्स
पशुखाद्यामुळे डीओसीचे दरात वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात पशुखाद्यासाठी डीओसीची मागणी वाढती आहे. याशिवाय सोयाबीनचे तेल, सोयामिल्क व अन्य पदार्थही तयार केल्या जातात. कोंबड्यांचे प्रमुख खाद्य सोयाबीनचे ढेपेपासून तयार केले जाते. या डीओसीचे आंतरराष्ट्रीय दरात मोठी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे पुरवठा कमी मागणी जास्त असल्याने प्लँटच्या दरातही आता वाढ झालेली असल्याचे दिसून येते.
बॉक्स
अमरावती बाजार समितीत सोयाबीनची स्थिती
दिनांक आवक भाव
२७ जुलै ५६५ ८,५००- ९,२००
२८ जुलै ४१७ ९,०००- ९,४००
२९ जुलै ९१६ ८,५००- ९,२५०
३० जुलै ८६५ ८,६००-९,६००
३१ जुलै १,०४४ ८,७००-९,७५०
कोट
मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने सोयाबीनला विक्रमी भाव मिळाला आहे. काही मोठ्या शेतकऱ्यांचा माल आजही बाजार समितीमध्ये तारणात आहे.
- नाना नागमोते
उपसभापती, अमरावती बाजार समिती