सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर, महिनाभरात पाच हजारांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:14 AM2021-09-26T04:14:17+5:302021-09-26T04:14:17+5:30

अमरावती : ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने सोयाबीनचे क्षेत्र जिल्ह्यात वाढत आहे. त्यात सहा महिन्यांपासून भावातही तेजी असल्याने साहजिकच यंदा ...

Soybean prices fall by Rs 5,000, down by Rs 5,000 in a month | सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर, महिनाभरात पाच हजारांची घसरण

सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर, महिनाभरात पाच हजारांची घसरण

googlenewsNext

अमरावती : ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने सोयाबीनचे क्षेत्र जिल्ह्यात वाढत आहे. त्यात सहा महिन्यांपासून भावातही तेजी असल्याने साहजिकच यंदा क्षेत्रवाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने ऑगस्ट महिन्यात विक्रमी १० हजारांवर भाव सोयाबीनला मिळाला. मात्र, यंदाच्या खरिपाचे सोयाबीन बाजारात येताच दरात पाच हजारांनी भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनची वाट लागली. माल डागी झाल्याने प्रतवारी घसरली व शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विकले. उत्पादनात कमी आल्याने जानेवारी पश्चात दरात वाढ व्हायला सुरू झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचे भाव १० हजार रुपयांच्या पार गेले. मात्र, त्यानंतर महिनाभरात शेतकऱ्यांचा माल बाजारात येताच आवक वाढली व दरात तब्बल पाच हजारांनी घसरण झालेली आहे. अशीच स्थिती राहिल्यास उत्पादन खर्चही पदरी पडणार की नाही, अशी भीती निर्माण झालेली आहे.

महिनाभरापासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना सवंगणी करणे शक्य नाही. पहिल्या टप्प्यातील सोयाबीनच्या झाडावरील शेंगांना कोंब फुटायला लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बॉक्स

सोयाबिनचे दर (प्रती क्विंटल)

जानेवारी २०२० : ३,९९०

जून २०२० : ३,५१९

ऑक्टोबर २०२० : ३,६९७

जानेवारी २०२१ : ४,१८३

जून २०२१ : ६,८३५

सप्टेंबर २०२१ : ५,५००

बॉक्स

सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)

२०१८ :२,४५,६००

२०१९ : २,५२,०००

२०२० : २,४८,०००

२०२१ : २,३८,४००

कोट

खोऱ्याने ओतला पैसा, आता काय करू?

उत्पादन कमी व प्रतवारी खराब असतानासुद्धा जानेवारीपासून पाच हजारांवर भाव मिळाला, ऑगस्टपर्यंत १० हजारांवर पोहचलेले भाव सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येताच पडायला सुरुवात झाली. व्यापाऱ्यांचे षडयंत्र व केंद्र शासनाचे आयात धोरण कारणीभूत आहे.

- भूषण देशमुख, शेतकरी

सोयाबिनसाठी एकरी १५ हजारांवर उत्पादन खर्च झालेला आहे. अजून सवंगणी व्हायची आहे. पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. पावसाने उत्पादनात कमी व बाजारात दरातही कमी येत असल्याने उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी भीती आहे.

- रोशन धर्माळे, शेतकरी

कोट

विकण्याची घाई करू नका

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झालेली आहे. शासनाच्या आयात धोरणाचा परिणाम झालेला आहे. आता नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने दरवाढ होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावे.

- अमर बांबल,

अडते, बाजार समिती

कोट

महिनाभरापासून सोयाबीनचे दरात कमी येत आहे. याला अनेक कारणही आहे. आता यंदाचे सोयाबीन बाजारात येत आहे. व मालात आर्द्रताही जास्त आहे. अशा परिस्थितीत सध्यातरी भाववाढ होण्याची शक्यता दिसत नाही.

- संजय जाजू,

व्यापारी

Web Title: Soybean prices fall by Rs 5,000, down by Rs 5,000 in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.