सोयाबीन उत्पादन घटले; ‘वेअर हाऊस’ रिकामेच !
By admin | Published: October 31, 2015 01:00 AM2015-10-31T01:00:02+5:302015-10-31T01:00:02+5:30
सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे.
सततच्या नापिकीचा परिणाम : सुरक्षित ठेवण्यास माल आणायचा कोठून?
अमरावती : सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यामुळे शेतमाल भाड्याने सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण केलेले ‘वेअर हाऊस’ रिकामेच पडले आहेत.
शेतकऱ्यांकडून त्यांच्या मालासाठी प्रतिक्विंटलनुसार भाडे आकारून ‘वेअर हाऊस’मध्ये सुरक्षित ठेवले जाते. शेतीमालासाठी प्रतिक्विंटल ८ ते १० रुपये दराने महिन्याकाठी भाडे आकारले जाते. वेअर हाऊसमध्ये माल ठेवून नंतर तो योग्यवेळी बाहेर काढला जातो. परंतु हल्ली शहरासह जिल्ह्यातही शेतमाल ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले ‘वेअर हाऊस’ ओस पडले आहेत. शेतकऱ्यांच्या घरीच शेतीमाल नाही तर ‘वेअर हाऊस’मध्ये ठेवणार कसा? हा प्रश्न आहे. बळीराजा सततच्या नापिकीने त्रस्त झाला आहे. त्यामुळे बळीराजावर अवलंबून असलेली आर्थिक यंत्रणासुध्दा कोलमडली आहे.
यावर्षी सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. प्रती एकर एक ते दीड क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती आले. यातून उत्पादन खर्चही निघू शकत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. वेळेवर पाऊस न आल्याने सोयाबीनची ही अवस्था झाली आहे.
- सुरेश मोलके,
शेतकरी, बडनेरा.
दरवर्षी सोयाबीनचे पीक आले की, शेतकरी ते गोदामात प्रतिक्विंटल आठ रुपये दराने भाड्याने ठेवतात. मात्र, यंदा क्विंटलभर सोयाबीनदेखील गोदामात ठेवण्यात आलेले नाही. यावरून बळीराजा किती मेटाकुटीस आला आहे, हे स्पष्ट होते.
- प्रेमकुमार आहुजा,
संचालक, वेअर हाऊस.