एसपी आपल्या गावी, सामान्यांशी थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:35 PM2018-11-13T23:35:18+5:302018-11-13T23:36:03+5:30
महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या बुधवारी पोलीस उपविभागीय कार्यालयात ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद साधणार असल्याचे अमरावती जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अवैध धंदे चालविणाºयांसह धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. हे जसे पोलिसांकडून अपेक्षित आहे तसेच समाजात वावरणाप्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समाजात दिसून येतील. पोलिसांचा कामाचा हुरूप वाढेल, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.
ते पुढे म्हणाले, परभणी व अमरावती जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे. एक तर हे विभागाचे मुख्यालय आहे. त्यामुळे कारभाराचा आवाका प्रचंड मोठा आहे. अमरावती येथे पदभार हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे. यापुढील काळात मागील तीन महिन्यांच्या कार्यकाळातील अदखलपात्र (एन.सी.) प्रलंबित अर्ज, महिलाविषयक तक्रारी, कायदेशीर शिथिल प्रकरणे, त्याचबरोबर तहसील कार्यालयात न्यायप्रविष्ट मामलतदार शेती प्रकरणे आदी प्रकरणांवर महिन्याच्या दुसºया व चौथ्या बुधवारी घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालयातील आढावा बैठक घेतली जाईल. पहिली आढावा बैठक अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात १४ नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर अंजनगाव सुर्जी पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात २८ नोव्हेंबर रोजी होईल, असे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी स्पष्ट केले.
आढावा बैठकीत संबंधित अर्जदार व गैरअर्जदार यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावले जाणार आहेत. सदर बैठक दुपारी १२ पासून ते अर्ज निपटारा होईपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपविभागीय अधिकारी व संबंधित ठाणेदार उपस्थित राहतील. अचलपूर येथे १४ नोव्हेंबर रोजी परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा थडी, शिरजगाव कसबा येथील ठाणेदार उपस्थित राहणार आहेत. अंजनगाव सुर्जी येथे २८ नोव्हेंबरला अंजनगाव सुर्जी, रहिमापूर, पथ्रोट येथील ठाणेदार उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तक्रारदाराने आढावा बैठकीतील तक्रार सर्वप्रथम त्या पोलीस ठाण्याला दिलेली असावी. त्यामध्ये त्यांचे समाधान झाले नसल्यास, तेच अर्ज या आढावा बैठकीत स्वीकारले जातील. क्षुल्लक कारणावरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला भर राहणार आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विस्तार लक्षात घेऊन मार्गदर्शक सूचना संबंधित ठाणेदारांना दिल्या असल्याचे दिलीप झळके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मोहीम
ठाणे स्तरावर दाखल प्रलंबित गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे तसेच अवैध धंदे चालविणाऱ्यांविरोधात विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर विशेष लक्ष
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे. त्याचा वापर कायद्याच्या चौकटीत करावा.
ठाणेदारांवरही वॉच
पोलीस अधीक्षक कार्यालयाची दारे ठोठावणारेही अनेक जण असतात. ठाणेदारांनी न्याय दिला नसल्याची फिर्याद मांडतात. त्यांच्या तक्रारींसाठी वेगळे बूकलेट एसपी कार्यालयात तयार आहे. त्यावरून संबंधित ठाणेदारांवर ‘वॉच’ ठेवला जातो.