एसपी ऑन रोड; पाच तास चालले ‘ऑपरेशन ऑल आऊट’, सिमेवर सशस्त्र नाकाबंदी
By प्रदीप भाकरे | Published: October 8, 2023 06:35 PM2023-10-08T18:35:56+5:302023-10-08T18:36:07+5:30
अचानकच राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर, जिल्हयातील राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने तथा सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
अमरावती: आगामी काळातील सार्वजनिक उत्सवादरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने पोलस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या नेतृत्वात ७ ऑक्टोबर रोजी रात्री १२ ते ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ या कालावधीत ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. अचानकच राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर, जिल्हयातील राज्याच्या सिमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहने तथा सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
गुन्हेगारांची आश्रयस्थाने, तडीपार आरोपी पकड़ वॉरंटमधील आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. ग्रामीण हद्दीतील धाबे, हॉटेल, लॉजेस, अवैध व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. मोहीमेदरम्यान मोर्शी येथील दरोडयाच्या गुन्हयात वान्टेड असलेल्या आरोपीकरिमोद्दीन नईमोद्दीन याला एलसीबीने अटक केली. तर, घनश्याम नंदवंशी (परतवाडा) व गोकुळ खंडारे (५२, रा. कोकर्डा) हे दोघे तडीपारीचा आदेश डावलून फिरताना दिसल्याने व रोहीत बेठे (अचलपुर), मोहन राऊत (पोरगव्हाण) व वैकुंठ वानखडे (रा. ब-हाणपूर) यांचेजवळ अवैध शस्त्र मिळून आल्याने त्यांच्याविरूध्द कार्यवाही करण्यात आली. मोहीमेदरम्यान एसपी अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, चार पोलीस उपअधिक्षक, ठाणेदार अशा एकुण ६६ पोलीस अधिकारी व ५७२ पोलीस अंमलदार मोहिमेत सहभागी झाले.
२७८ गुन्हेगारांची तपासणी
सचिन बेदरकर (कांडली), शेख इब्राहिम शे. मोहम्मद (अचलपुर) व आकाश इंगोले (अंजनगांव) हे रात्रीदरम्यान काहीतरी गुन्हा करण्याचे तयारीने फिरत असल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात आली आहे. पोलीसांचे अभिलेखावरील निगराणी बदमाश, मालमत्तेचे गुन्हे करणारे, शस्त्र अधिनियमान्वये गुन्हे दाखल असलेले, अंमली पदार्थाचे गुन्हे दाखल असलेले, गुटखा विक्रीचे गुन्हे दाखल असलेल्या एकूण २७८ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
१२१७ वाहनांची तपासणी
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान १२१७ वाहनांची तपासणी करण्यात आली. ९० वाहनांचालकांना २१ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. अवैध दारुच्या ३२ केसेस करुन ५३,२३० रुपयांचा, अचलपूर, दर्यापूर, सरमसपुरा येथे गुटखा कारवाईच्या चार केसेस मध्ये ७९,३०० रुपयांचा, तसेच आसेगांव पुर्णा येथे अवैध रेती वाहतुकीचे अनुषंगाने एका प्रकरणात तीन लाखांचा मुदेमाल जप्त करण्यात आला. पकड वॉरंटमधील ३५ आरोपींना अटक करण्यात आली. ६४ जमानती वॉरंट व २२२ समन्स बजावणी करण्यात आली.