खोटे बोला, रेटून बोला, त्यांचेच नाव ‘मोदी’
By admin | Published: October 9, 2014 10:54 PM2014-10-09T22:54:25+5:302014-10-09T22:54:25+5:30
‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवून भाजपच्या मोदी सरकारने निवडणूक जिंकली. परंतु गेल्या चार महिन्यांत सर्वसामान्यांच्या सर्व मूलभूत गरजा महाग करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला.
नारायण राणेंचा कडाडून हल्ला : चांदूररेल्वे, अंजनगाव सुर्जीत जाहीर सभा
चांदूररेल्वे/अंजनगाव सुर्जी : ‘अच्छे दिन’ येणार असल्याची स्वप्ने दाखवून भाजपच्या मोदी सरकारने निवडणूक जिंकली. परंतु गेल्या चार महिन्यांत सर्वसामान्यांच्या सर्व मूलभूत गरजा महाग करून मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केला. ‘खोटे बोला पण रेटून बोला त्यांचेच नाव मोदी’, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणेंनी भाजप आणि मोदींवर हल्ला चढविला. काँग्रेस, रिपाइंच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ अंजनगाव सुर्जी व चांदूररेल्वे येथे आयोजित जाहीर प्रचारसभांना ते संबोधित करीत होते.
सर्वसामान्य जनतेसाठी ज्या जीवनावश्यक औषधींचे भाव काँग्रेस शासनाने स्थिर ठेवले, त्या ६९२ औषधींपैकी तब्बल १०८ औषधींना मोदी शासनाने स्थिर किमतीच्या यादीतून बाहेर काढले. याचा फायदा उद्योजकांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही राणेंनी यावेळी केला. मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना राणे म्हणाले की, मोदींनी नाशिकच्या कांद्याची निर्यात बंद करुन तेथील शीतगृहात आता ईजिप्तचा कांदा भरला आहे. मालवाहतुकीसाठी असलेली मुंबईची गोदी बंद करुन गुजरातला नेली. त्या गोदीची १८०० एकर जमीन गुजरातच्या उद्योगपतींना दिली. ठाणे येथील संरक्षणविषयक प्रशिक्षण केंद्रसुध्दा गुजरातला पळविण्यात आले. सध्याचे पंतप्रधान देशाचे की फक्त गुजरातचे हे, कळण्यास मार्ग नाही, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.
आता मोदी ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी के साथ’ असा नारा देत आहेत. महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवरायांनी गुजरातवर अनेक चढाया केल्या. तेव्हा गुजरातवाले शिवरायांना नको नको ते बोलत असत. आज तेच शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागताहेत. खरेच शिवाजी महाराज यांना आशीर्वाद देतील का, असा संतप्त सवालही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
‘अच्छे दिन’ आले; पण कोणाचे? मोदींच्या मित्रांचे. त्यांची संपत्ती चार महिन्यांत दुप्पट, तिप्पट झाली, असा आरोप करीत नारायण राणे यांनी मोदींच्या विदेश दौऱ्यावरही टीका केली. मोदी विदेशात गेले, तेथील उद्योजकांना भारतात उद्योगधंद्यासाठी बोलाविले. भारतात चांगली साधन संपत्ती आहे, असे सांगितले. पण, ही साधन संपत्ती, हे रस्ते, वीज, पाणी कोणी उभे केले? काँग्रेसनेच ना? असे राणे म्हणाले.
सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत बोलताना राणे म्हणाले, कालपर्यंत सेना-भाजपची युती होती, तोपर्यंत सर्व सुरळीत होते. युती तुटली आणि आज भाजपवाले शिवसेनेला उंदीर म्हणत आहेत. काँग्रेसने विरोधक असूनही शिवसेनेला फक्त मांजरच म्हटले होते. पण, त्यांचेच एकेकाळचे साथीदार त्यांच्यावर अत्यंत लाजीरवाणी टीका करीत आहेत.
मोदी म्हणतात, गोपीनाथ मुंडे त्यांच्या लहान भावाप्रमाणे होते. पण, हा लहान भाऊ केंद्रीय मंत्री असूनदेखील मोदी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी का झाले नाहीत? अशा प्रखर शब्दांत राणेंनी मोदींवर हल्लाबोल केला. जोगेंद्र कवाडे यांनीही यावेळी भाजप व बसपचा खरपूस समाचार घेतला.