पावसाळ्यात २२ गावांवर विशेष लक्ष
By admin | Published: June 1, 2017 12:11 AM2017-06-01T00:11:36+5:302017-06-01T00:11:36+5:30
पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
सतर्क राहण्याच्या सूचना : साथीचा उद्रेक झाल्यास दोषींवर कारवाई
जितेंद्र दखने । लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाळ्यामध्ये सतर्क राहण्याच्या दृष्टिने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मागील तीन वर्षात साथीचा उद्रेक झालेल्या गावांसह जिल्ह्यातील एकूण २२ गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
पावसाळयाच्या दिवसात नैसर्गिक आपत्ती व पूरपस्थितीमध्ये कोणतीही साथ उद्भवू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजनांची आखणी केली आहे. गत तीन वर्षात डेंग्यू, चिकनगुनिया, गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, लेप्टोस्पायरोसिन आदी साथींचा उद्रेक झालेल्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पावसाळयातील संभाव्य पूरग्रस्त भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच या गावांना आरोग्य कर्मचारी, पर्यवेक्षकांनी वेळोवेळी भेट देऊन नियमित रोगविषयक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनाही नियमित पाणी शुध्दीकरण जलजन्य साथीचा आजार, उपचाराबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. घरोघरी मेडिक्लोरचे वाटप तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालय पूर्व परवानगी शिवाय सोडू नये, अशा कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जोखीमग्रस्त गावे
तांगडा, चोपन, कावळा, झिरी, किन्हाखेडा, कुड, धोकड, सोनाबर्डी, डोलार, परसोली, पळळसकुंडी, डोमी, कुही, रूईपठार, कुटीदा, सुमिता, कारंजखेडा, मारिता, राक्षा, अढाव, रेहटयाखेडा, बिच्छूखेडा, माडीझडप आदी गावे जोखीमग्रस्त आहेत.
असे आहे नियोजन
वैद्यकीय पथकाची स्थापना, जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क, जनतेला आरोग्य शिक्षण देण्याच्या सूचना, जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन,साथ नियंत्रण अधिकारी नियुक्त, घरोघरी मेडिक्लोर वाटप, २४ तास वैद्यकीय पथके कार्यरत राहणार, प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच तालुकास्तर व जिल्हास्तरावर २४ तास वैद्यकीय पथक ाची स्थापना, जिल्ह्यातील ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ३३३ उपकेंद्रांना आरोग्य विभागाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात येणार आहे.
पावसाळ्याचे दिवस तोंडावर असल्यामुळे आरोग्य विभागाने संभाव्य साथरोगाचा उद्रेक रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहे. संबंधितांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
- नितीन भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी