कुलगुरू नियुक्तीत आता राज्य शासनाचे विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:33+5:302021-07-11T04:10:33+5:30
अमरावती : राज्यात अकृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरुपदी पात्र व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आता राज्य शासनाचे विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता ...
अमरावती : राज्यात अकृषि विद्यापीठांमध्ये कुलगुरुपदी पात्र व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आता राज्य शासनाचे विशेष लक्ष असणार आहे. त्याकरिता शिक्षण क्षेत्रातील १३ जणांची समिती गठित करण्यात आली असून, समितीचा अहवाल प्राप्त होताच त्वरेने अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
ना. सामंत हे शनिवारी अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रपरिषदेतून उच्च व तंत्र शिक्षण विभागातील नव्या घडामोडींविषयी माहिती दिली. यादरम्यान माजी आमदार आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते आणि बहुतांश अकृषि विद्यापीठात संघ विचारसरणीचे कुलगुरू नियुक्त करण्यात आल्याची बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती. या प्रश्नांवर ना. सामंत यांचे लक्ष वेधले असता, आता अकृषि विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीत राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेत १३ जणांची समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या काही दिवसांत शासनाला मिळणार आहे.
अहवालाचा आधार घेत अकृषि विद्यापीठात कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया राबविली जाईल. कोणत्याही विचारसरणीपेक्षा ती व्यक्ती पदासाठी पात्र आहे अथवा नाही, याकडे अधिक भर दिला जाणार असल्याचे ना. सामंत म्हणाले.
पत्रपरिषदेला आमदार किरण सरनाईक, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्याम देशमुख, राजेश वानखडे, दिलीप जाधव, आशिष धर्माळे उपस्थित होते.
----------------
विद्यापीठांच्या परीक्षा तूर्त ऑनलाईनच
कोविड १९ चा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे पुढील काही काळ विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्यात येणार आहेत तसेच महाविद्यालयेदेखील तूर्त सुरू होणार नाही, ही बाब ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केली. भविष्यातही महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहील, असे त्यांनी सांगितले.