मेळघाटात 'स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:53 PM2019-09-01T23:53:46+5:302019-09-01T23:54:08+5:30
संपर्क यंत्रणेसाठी आवश्यक परवानगी व इतर कार्यवाही दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. बांधकाम विभाग, महावितरण व विविध नेटवर्क कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, रिलायन्सचे योगेश ठाकरे, समीर केणेंसह विविध विभागांचे व कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चिखलदरा : दुर्गम मेळघाटात रस्ते, वीज व नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे भक्कम जाळे पसरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मेळघाट 'स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन' राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात भक्कम संपर्क यंत्रणेसाठी आवश्यक परवानगी व इतर कार्यवाही दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
बांधकाम विभाग, महावितरण व विविध नेटवर्क कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, रिलायन्सचे योगेश ठाकरे, समीर केणेंसह विविध विभागांचे व कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवाल म्हणाले, मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणा उभारण्यासाठी वीज, रस्ते व नेटवर्क कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅननुसारनुसार समन्वयाने व गतीने काम करण्यात येईल. आवश्यक सेवांच्या एकसंध परिणामातूनच दुर्गम परिसरातही भक्कम संपर्क निर्माण होईल व विकासाला चालना मिळेल. धारणी तालुक्यातील आठ व चिखलदरा तालुक्यातील १६ गावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी ३६ कोटी ९२ लक्ष रुपये निधीचा महावितरणचा प्रस्ताव आहे. त्यापैकी १२ गावांबाबतचा प्रस्ताव वनविभागाच्या परवानगीसाठी पाठविला. उर्वरित गावांचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावा. बीएसएनएलकडून काही ठिकाणी टॉवर सुरू आहेत. मात्र, नियोजनानुसार सर्व टॉवर कार्यान्वित झाले नाहीत. ते काम दोन आठवड्यात पूर्ण करावे. रिलायन्स जिओकडून १२ टॉवर उभारण्यात आले व ३६ टॉवर निर्माण होत आहे. वनविभागाकडून परवानगी त्वरित मिळवण्यात याव्यात. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची भक्कम बांधणी व वेळोवेळी दुरुस्ती करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव आदी कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. एकताई, भांडुम, सलिता, लाखेवाडी या गावांत विद्युतीकरणाची कार्यवाही होत आहे, असे खानंदे यांनी सांगितले.