विशेष पोलीस महानिरीक्षक पोहोचले अंजनगाव सुर्जी ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:22 PM2018-09-09T22:22:16+5:302018-09-09T22:22:45+5:30
जीन्स पॅन्ट, टी-शर्ट असा सर्वसाधारण व्यक्तीच्या वेषभुषेत विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे शनिवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यापूर्वीच त्यांनी परिचय दिल्याने पोलिसांची भंबेरीच उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जीन्स पॅन्ट, टी-शर्ट असा सर्वसाधारण व्यक्तीच्या वेषभुषेत विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे शनिवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी पोहोचले. पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यापूर्वीच त्यांनी परिचय दिल्याने पोलिसांची भंबेरीच उडाली.
ठाण्यापासून काही अंतरावर वाहन उभे करून ते पायदळ पोलीस ठाण्यात प्रवेशले. खाकी वर्दीत नसल्याने ेठाण्यातील पोलिसांनी त्यांना ओळखले नाही. तक्रारीच्या अनुषंगाने स्टेशन डायरीवरील पोलिसांनी तरवडे यांना विचारपूस केली. त्यावेळी पाकिट हरविल्याबाबत तक्रार करायची असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस तक्रार लिहून घेणारच, तेवढ्यात आयजी श्रीकांत तरवडे यांनी त्यांची ओळख सांगितली. चक्क आयजीच ठाण्यात आल्याचे पाहून तेथे उपस्थित सर्वच पोलीस अवाक झाले. अमरावती परिक्षेत्राचे ‘बॉस’ अवतरल्याने पोलिसांची बोबडी वळली. ठाणेदारांनीही कक्ष सोडून आयजींना सॅल्यूट ठोकला. त्यांना कक्षात नेले. तथापि त्यानंतर आपण आढावा घेण्यासाठी आलो असलो तरी तक्रारकर्त्याला कशी वागणूक दिली जाते, हे पाहण्यासाठी आपण आलोत , हे सांगितल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. अंजनगाव सुर्जी ठाणे संवेदनशिल आहे, त्यामुळे आयजी श्रीकांत तरवडे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेण्यासाठी पोहोचल्याचे ज्ञात होताच पोलिसांवरील ताण हलका झाला. त्यानंतर तरवडे यांनी ठाणेदारांशी चर्चा केली. आढावा घेण्यासाठी तेथून ते परतवाडा रवाना झाले. आयजींची आकस्मिक भेट अंजनगाव सुर्जी पोलिसांसाठी अत्यंत महत्वाची आणि तेवढीच आश्चर्यजनक ठरली .गणेशोत्सव व त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात स्ट्रॉग पोलिसिंगचे निर्देश त्यांनी दिले.
गणेशोत्सवानिमीत्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी गेलो होतो. तत्पूर्वी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून मी तक्रार करण्यासाठी गेल्यावर पोलीस कसे वागतात व बोलतात, याचे निरीक्षण केले.
- श्रीकांत तरवडे,
विशेष पोलीस महानिरीक्षक,