विशेष सभेचा प्रस्ताव धुडकावला!
By admin | Published: March 8, 2016 12:15 AM2016-03-08T00:15:50+5:302016-03-08T00:15:50+5:30
'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती.
जिल्हा परिषद : २५ सदस्यांची होती मागणी
अमरावती : 'जलयुक्त शिवार व पाणीटंचाई' या विषयावर संयुक्त सभा घेण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय २५ सदस्यांनी अध्यक्ष सतीश उईके यांना २३ फेब्रुवारी रोजी पत्राव्दारे मागणी केली होती. मात्र हा प्रस्तावच सत्ताधाऱ्यांनी धुडकावल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील गावांमध्ये भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये व मागील दोन वर्षांपासून पाण्याचा स्त्रोत वाढावा याकरिता जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या लेखाशिर्षातून खर्च करण्यात येत आहे. यामधील कामाचा आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार आणि पाणीटंचाई विषयावर विशेष सभा बोलावण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्षांकडे लावून धरली होती. यासंदर्भात २५ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र अध्यक्षांना मंगळवार २३ फेब्रुवारीला दिले होते. जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. परिणामी भविष्यात पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढावा याकरिता जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.
होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कितपत फायदेशीर ठरला यासह दोन वर्षांतील कामांचा आढावा घेण्यासाठी जलयुक्त शिवार, पाणीटंचाई या विषयावर संयुक्त सभा घेण्याची मागणी पत्राद्वारे अध्यक्षांकडे केली आहे. या पत्रावर जि.प.च्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, प्रमोद वाकोडे, अभिजित ढेपे, जया बुंदिले, चित्रा डहाणे, वनमाला खडके, सुषमा कलाने, विद्या तट्टे, संगीता चक्रे, वर्षा आहाके, अरुणा गावंडे, सुनीता देशमुख, पुष्पा सावरकर, मंदा गवई, सुधाकर उईके, प्रवीण घुईखेडकर, मोहन पाटील, ममता भांबूरकर, भुरा बेठे, चंद्रपाल तुरकाने, सदाशिव खडके आदी जि.प. सदस्य आणि विनोद टेकाडे, गणेश राजनकर, अर्चना वेरुळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र सदस्यांच्या मागणीचा हा प्रस्तावच जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाने फेटाळल्याने याविषयावरच पडदा टाकण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
काही सदस्यांचे समाधान झाल्याचे पत्र
जिल्हा परिषदेतील जवळपास २५ सदस्यांनी जलयुक्त शिवार व पाणीटंचाई या विषयावर संयुक्त सभा घेण्याची मागणी केली होती. मात्र यावर स्वाक्षरी करणाऱ्या काही सदस्यांनी आमचे समाधान झाल्याचे पत्र अध्यक्षांकडे दिले आहेत. मग अगोदरच सभेची मागणी करण्यासाठी निवेदनावर स्वाक्षरी क शाला केली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी विशेष सभेसाठी माझ्याकडे लेखी पत्र दिले होते. मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही.
- सतीश उईके,
अध्यक्ष, जिल्हा परिषद
जलयुक्त शिवार व पाणी टंचाईची विशेष सभा बोलविण्यात यावी यासंदर्भात काही सदस्यांचे पत्र अध्यक्षांना दिले होते. परंतु यावर कुठलाही तोडगा काढला नाही.
- सतीश हाडोळे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद