जलयुक्त शिवारच्या विशेष सभेत गदारोळ
By Admin | Published: April 26, 2016 12:09 AM2016-04-26T00:09:57+5:302016-04-26T00:09:57+5:30
जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी यांचे कडून प्राप्त जलयुक्त शिवार अंतर्गत निवडण्यात आलेल्या गांवाची माहिती व नियोजन करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली....
जिल्हा परिषद : विरोधकांनी विचारला जुन्या कामाचा लेखाजोखा
अमरावती : जिल्हा परिषदेत जिल्हाधिकारी यांचे कडून प्राप्त जलयुक्त शिवार अंतर्गत निवडण्यात आलेल्या गांवाची माहिती व नियोजन करण्यासाठी सोमवारी बोलविण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभेत गदारोळ केल्याने ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे मूळ विषयावर कुठलीही चर्चा न होताच ७६ कोटीच्या कामाची माहिती व नियोजन हे प्रशासनापुरते मर्यादित राहण्याचा प्रसंग अनुभवयाला मिळाला.
जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाकडे सन २०१५-१६ करिता जि.प. सिंचन विभागाने जिल्हाभरातील ३०९ कामे प्रस्तावीत केली होती. त्यापैकी २५३ कामे जिल्हाधिकारी यांनी मंजूर करून याबाबतची यादी सिंचन विभागाकडे पाठविली आहे. यासाठी सुमारे ७६ कोटी रूपयांचा निधीही मंजूर केला आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेची कामे मंजूर केल्यामुळे या यादीत समाविष्ट गावातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्याशी चर्चा क रून कामांचे नियोजन करण्यात आले. मात्र यामध्ये जी गावे सुटली त्या गावांचा समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेत ही सभा बोलवण्यात आली. मात्र यावर चर्चा करण्यापूर्वी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचे सदस्य सुधीर सूर्यवंशी , सुरेखा ठाकरे, रवींद्र मुंदे, अभिजित ढेपे, आदींनी सभेला मुख्यकार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, कृषी विभागाचे अधिकारी हजर नसल्याने आमच्या प्रश्नांचे उत्तर कोण देईल, असा मुद्दा या सदस्यांनी सभेत उपस्थित करीत सभागृहात चांगलाच गोंधळ केला.
विकासाच्या मुद्यावर चर्चाच नाही
अमरावती : सभेत विषय सुचिवर कुठलीही चर्चा न करताच गदारोळातच अध्यक्षांनी ही सभा आटोपली असल्याचे जाहीत करत सदस्यांनी जलयुक्त शिवार अभियानात सदस्यांनी सुटलेल्या गावांच्या संदर्भात पत्र देण्याचे आवाहन सदस्यांना केले. एकंदरीत सभेत विकासाच्या मुद्यावर चर्चा होवू शकली नाही.
सभेला अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, सरिता मकेश्र्वर, अरूणा गोरले, सदस्य मोहन सिंगवी, प्रविण घुईखेडकर, मोहन पाटील, उमेश केने, ममता भांबुरकर, विनोद टेकाडे व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील, डेप्युटी सिईओ प्रकाश तट्टे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.