जप्त मालमत्तांच्या लिलाव प्रक्रियेला गती, जिल्हाधिका-यांचे सक्षम प्राधिका-यांना स्मरणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 06:09 PM2017-09-13T18:09:08+5:302017-09-13T18:09:19+5:30
आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावास विलंब होत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
अमरावती, दि. 13 - आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावास विलंब होत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिका-यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिका-यांमार्फत प्राप्त पत्राची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्त उपविभागीय अधिका-यांंनी दखल घेत लिलाव प्रक्रियेला गती दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळाण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
श्रीसूर्या, राणा लॅन्डमार्क, सात्विक व मैत्रेय या चारही कंपन्यांच्या संचालकांविरूद्ध ‘एमपीआयडी’ कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची तब्बल ११८ कोटी १३ लाखांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्या होत्या. चौकशीनंतर पोलिसांनी चारही कंपन्यांची विविध राज्यांतील सुमारे १५० कोटींची मालमत्ता उघड केली. यामध्ये श्रीसूर्या, राणा लॅन्डमार्क व सात्विकच्या फसवणूक प्रकरणात शासनाने सक्षम प्राधिका-यांची नियुक्ती केली आहे. सक्षम प्राधिकारी या उघड मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांना पैसे परत करणार आहे.
श्रीसूर्याकडून ६० कोटींची फसवणूक
श्रीसूर्या कंपनीने गुंतवणूकदारांची तब्बल ६० कोटींनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी समीर जोशीसह १४ जणांविरूद्ध गुन्हे नोंदवून त्यांची ७ कोटी ९७ लाख ९७ हजार ३३९ रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. यामध्ये १६ आॅगस्ट २०१४ रोजी सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात आले असून तशी अधिसूचना २४ फेब्रुवारी २०१५ रोजी निघाली आहे.
‘राणा लॅण्डमार्क’द्वारे १३ कोटींचा चुना
राणा लॅण्डमार्कने गुंतवणूकदारांची १३ कोटींनी फसवणूक केली आहे. कोतवाली पोलिसांनी योगेश नारायण राणा, चंद्रशेखर राणा, शशीकांत जिचकार, अभय शिरभाते, अभिजित लोखंडेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची १७ कोटी ८५ लाख ८५ हजार ९०० रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. सक्षम प्राधिकारी नियुक्त असून २५ एप्रिल २०१६ रोजी अधिसूचना निघाली आहे.
सात्विकद्वारे १३ लाखांचा गंडा
सात्विकने गुंतवणूकदारांची १४ लाखांनी फसवणूक केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी अमोल ढोकेविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची १६ लाख ८५ हजार २५० रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. यामध्ये १० फेब्रुवारी २०१६ रोजी सक्षम प्राधिकारी नियुक्त झाले आहेत. १० आॅगस्ट २०१६ रोजी अधिसूचना निघाली आहे.
मैत्रेयने केली ३५ कोटींनी फसवणूक
मैत्रेय कंपनीने ग्राहकांची ३५ कोटींनी फसवणूक केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी जनार्दन परुळेकरसह सहा आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी त्यांची १२५ कोटी ७४ लाख ३४ हजार ६८७ रूपयांची मालमत्ता उघड केली आहे. याबाबत सक्षम प्राधिका-यांची नियुक्ती अद्याप झाली नाही.
आर्थिक फसवणूकप्रकरणी पोलिसांनी जप्त केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे. यासंबंधित दस्तऐवज दिवाणी न्यायालयात दाखल केले आहे. त्यांच्या निर्णयानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- इब्राहिम चौधरी,
सक्षम प्राधिकारी (उपविभागीय अधिकारी)