जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतर कर्जवाटपाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:34 PM2018-06-25T23:34:19+5:302018-06-25T23:34:34+5:30
यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे.
यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यात खरीप कर्जवाटपाचे लक्ष्यांक १,६३० कोटींचे आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांना १०९६ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना २२ जूनपर्यत १५ हजार ७७७ शेतकऱ्यांना १८५.१७ कोटींचे वाटप करण्यात आले. ही टक्केवारी १७ अशी आहे. ग्रामीण बँकांना १४ कोटींचा लक्ष्यांक असताना २३९ शेतकºयांना २.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १६ अशी आहे. जिल्हा बँंकेला ५२० कोटींचा लक्ष्यांक असतांना ११,३४५ शेतकऱ्यांना ९८ कोटी ८९ लाकांचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी १९ अशी आहे.
जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख २१ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. तसेच ५० हजारांवर शेतकरी नियमित खातेदार आहेत व २० हजारांवर शेतकऱ्यांनी प्रोत्साहन, ओटीएस योजनेतंर्गत कर्जाचा भरणा केलेला आहे. असे एकूण किमान दोन लाख शेतकरी कर्ज मिळण्यास पात्र आहेत. मात्र बँकांचे उंबरठे झिजवित असतांना त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. यंदाच्या खरिपासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपास सुरूवात झाली. मात्र दोन महिण्यात तीन टक्केच कर्जवाटप झाल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेतली. अनावश्यक कागदपत्रे मागवून बँका शेतकºयांना त्रास देत असल्याने कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची निश्चिती केली व दर आठवड्यात दोन वेळा कर्ज वाटपाचा आढावा घेतला जात असल्याने आता कर्जवाटपास गती आलेली आहे.
-तर प्रशासकीय कारवाई, नोटीस जारी
भातकुली, चिखलदरा व धारणी वगळता उर्वरित तालुक्यांमधील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये कर्जवाटप माघारल्याने ११ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. लक्ष्यांक पुर्तीसाठी नियोजन करून गरजू शेतकºयांना तत्काळ कर्जवाटप पुर्ण करावे. कर्जवाटपासंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास वैतयक्तिक दोषी धरण्यात येऊन प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पीक कर्जवाटपासाठी आता ग्रामस्तरीय समिती
विहित मुदतीत लक्ष्यांकपूर्ती व्हावी, यासाठी सर्व गावांमध्ये चार सदस्यीय ग्रामस्तर समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या समितीचे अध्यक्ष तलाठी व कृषी सहाय्यक सदस्य सचिव राहणार आहे. या समितीमध्ये ग्रामसेवक व सबंधित सोसायटींचे गटसचिव देखील राहणार आहे. ग्रामस्तरावरील या समितीने पीककर्ज मागणी अर्ज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यत पोहचण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.