ऑनलाईन दीक्षांत समारंभासाठी ऑफलाईन कामकाजाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:42+5:302021-05-24T04:11:42+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २९ मे रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कठोर संचारबंदी लागू असताना, विद्यापीठात दीक्षांत समारंभाच्या तयारीसाठी अधिकारी, कर्मचारी गर्दी करणार असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दीक्षांत समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. मात्र, या ऑनलाईन दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने आवश्यक तयारीसाठी ऑफलाईन मनुष्यबळ कर्तव्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महापालिका, महसूल, आरोग्य व पोलीस यंत्रणा वगळता, अन्य विभाग सुरू करण्यास मनाई केली आहे. महाविद्यालये, शाळा अथवा विद्यापीठाला ऑनलाईन परीक्षांची कामे करता येतील, ही बाब नव्या आदेशात स्पष्ट केली आहे. असे असताना ऑनलाईन दीक्षांत समारंभासाठी ऑफलाईन कामकाजासाठी विभागनिहाय चार ते पाच कर्मचारी कर्तव्यावर बोलावण्यात येत आहे. यात विद्या विभाग, मराठी विभाग, वित्त विभाग, भांडार विभाग, परीक्षा विभाग, प्रशासन, आस्थापना विभाग, अभियांत्रिकी विभाग, जनसंपर्क विभाग, उद्यान विभाग आदी विभागांतील अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर नियुक्त राहतील, असे आदेशात नमूद आहे.