अमरावती विद्यापीठात नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेला वेग, ११ जुलै रोजी बैठक
By गणेश वासनिक | Published: July 9, 2023 04:00 PM2023-07-09T16:00:54+5:302023-07-09T16:01:17+5:30
विद्वत, व्यवस्थापन परिषदेची होणार बैठक; कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी नेमणार
गणेश वासनिक, अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात नव्या कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेला वेग आला असून विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर संस्था संचालकाची कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी म्हणून निवड केली जाणार आहे. त्यानंतर हे नाव विद्यापीठ प्रशासन राज्यपालांकडे पाठविणार असल्याची माहिती आहे.
अमरावती विद्यापीठ प्रशासनाने नव्या कुलगुरू निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषदेच्या सदस्यांनी ११ जुलै रोजीच्या बैठकीचा अजेंडा पाठविला आहे. यात कुलगुरू निवड समितीत प्रतिनिधी नेमले जाणार असल्याने राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था चालकांच्या नावावर मंथन अथवा प्रस्ताव सादर करून एक नाव निश्चित केले जाणार आहे. हे नाव राज्यपाल कार्यालयाकडे पाठविल्यानंतर राज्यपालांच्या निर्देशानुसार अमरावती विद्यापीठात नवव्या कुुलगुरूपदाच्या नियुक्तीकरिता समिती गठित केली जाणार आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अथवा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे अध्यक्ष असतील, तर सचिवपदी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण प्रधान सचिव हे कामकाज पाहतील. तर या समितीत सदस्यपदी विद्यापीठाने निवड केलेला प्रतिनिधी असेल तर नोडल अधिकारी म्हणून आयआयटीचे संचालक हे असणार आहे.