जलयुक्त शिवाराच्या कामाची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 12:21 AM2017-06-19T00:21:04+5:302017-06-19T00:21:04+5:30
तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये यावर्षी नव्याने १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
कामांना सुरुवात : १५ गावांचा नव्याने समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये यावर्षी नव्याने १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याच योजनेंतर्गत १९ बंधारे व तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवाराचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. पण यावर्षी कामाची गती मंदावली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जावरा, उदापूर, पाळा, ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली ब्राम्हणवाडा, बेलखेडा, गणोजा, आसेगाव पूर्णा, गोविंदपूर, जगन्नाथपूर, हिरुळपूर्णा, कोंडवर्धा, मौजखेडा, मासोद, शहापूर या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी तलावातील गाळ काढणे व तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविणे, पाणी अडविणे व पाणी जिरविणे यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा योजनेचा उद्देश आहे. यासाठी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करणे, गावतलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव, निजामशाही तलाव, माती नाला बंधाऱ्यातील गाळ काढणे, जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला जोड प्रकल्प राबविणे, विहिरीचे बोअरवेलचे पुनर्भरण करणे, मोकळ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, शिवारातील पाण्याचा शिवाय नियोजन करणे यासाठी जि. प. च्या लघुसिंचन विभाग, पाटबंधारे विभागाकडेही याची जबाबदारी देण्यात आली आहे.