नवीन रस्त्यासोबत मणक्याचा आजार फ्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:32+5:302021-06-10T04:10:32+5:30
फोटो - पी ०९ गांधीपूल नरेंद्र जावरे - परतवाडा : ऐतिहासिक अचलपूर शहरातच आढळणाऱ्या आश्चर्यांमध्ये आणखी एक भर पडली ...
फोटो - पी ०९ गांधीपूल
नरेंद्र जावरे - परतवाडा : ऐतिहासिक अचलपूर शहरातच आढळणाऱ्या आश्चर्यांमध्ये आणखी एक भर पडली आहे. आठ दिवसांपूर्वीच डांबरीकरणाचे नूतनीकरण करण्यात आलेल्या एक किलोमीटर अंतरावरील रस्तावर तब्बल २८ गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मणक्याच्या आजाराला हे गचके निमंत्रण ठरले असून, यापेक्षा खड्डेमय रस्ताच बरा, असे म्हणायची वेळ ये-जा करणाऱ्या नागरिकांवर आली आहे.
अचलपूर नगरपालिका अंतर्गत दुर्गा गेट ते श्रीकृष्ण पूल, गांधी पूलपर्यंत एक किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या मार्गावर दुचाकी, चारचाकीने जाणाऱ्या नागरिकांपुढे प्रचंड अडथळे निर्माण झाले आहेत. अगदी शंभर ते दीडशे फुटांवर गतिरोधक टाकण्यात आल्यामुळे मणक्याच्या आजाराला निमंत्रण ठरले आहे. अरुंद रस्त्यांवर दुचाकीस्वार भरधाव वेगाने धावतात. त्याला आवर घालण्यासाठी नागरिकांनी हा पर्याय सुचविला असला तरी तो इतर नागरिकांना त्रासदायक वजा आजाराला आमंत्रण देणारा ठरला आहे. पूर्णत: नियमबाह्य असलेले गतिरोधक कुठल्या नियमाने टाकण्यात आले, हे मात्र आश्चर्य आहे.
बॉक्स
कंत्राटदाराने टाकले २८ स्पीड ब्रेकर
शहरातील अंतर्गत रस्ते अचलपूर नगरपालिकेच्या अखत्यारीत असले तरी त्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत केली जात आहेत. दुल्हा गेट ते गांधी पूलपर्यंत करण्यात आलेल्या या एक किलोमीटर रस्त्यावर टाकण्यात आलेले २८ गतिरोधक कंत्राटदाराने स्वतःहूनच नागरिकांच्या म्हणण्यावरून टाकल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.
बॉक्स
त्यापेक्षा खड्डेमय रस्ता बरा
लाखो रुपये खर्च करून पूर्वीच्या खड्डेमय रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र, खड्ड्यांचा आणि गतिरोधकाचा त्रास सारखाच झाल्याने नवीन रस्त्याला अर्थ काय? दोन्ही ठिकाणी मणक्यासह पाठ, कमरेचा त्रास सायकलस्वार ते चारचाकीचालक सर्वांनाच करावा लागत आहे.
कोट
सदर मार्गावरील रस्त्याचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. वर्दळ असलेल्या दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक टाकण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले होते. परंतु, त्याने नागरिकांच्या म्हणण्यावरून ठिकठिकाणी गतिरोधक टाकले असावे. याची माहिती घेत आहोत.
- विजय वाठ, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर