अमरावतीत कीटकनाशकांची फवारणी करताना दोन शेतक-यांचा बळी, यंत्रणा हादरली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:26 PM2017-10-09T19:26:45+5:302017-10-09T19:26:55+5:30
कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा हादरली आहे. सामान्य रूग्णालयाच्या माहितीनुसार यंदा जानेवारीपासून आतापर्यंत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाले असल्याने मृत्यूच्या फवारणीची लागण जिल्ह्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर शेतकºयांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतकºयांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्च्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अशा घटनांचा शोध घेण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात अशाप्रकारे एकाही शेतकºयाचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र सात आॅक्टोबरनंतर विविध रूग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यांत दोन शेतकºयांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे. १ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५४ विषबाधेचे रूग्ण दाखल झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रूग्णालयाच्या हवाल्याने दिली. मात्र रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती शेतकºयांना विषबाधा झाली याची नेमकी माहिती नाही.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, माहुली जहांगीर ठाण्यांतर्गत डवरगाव येथील प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्यांतर्गत ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांत शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, याविषयी अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन कार्यवाहीचे निर्र्देश दिले आहेत.
आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे १३ रूग्ण
जिल्हा सामान्य रूग्णालयात एक आॅक्टोबरपासून आतापर्यत विषबाधेचे १३ रूग्ण दाखल झालेत, तर एक जानेवारीपासून आतापर्यंत १५४ रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती निवासी उपजिल्हााधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली. या रूग्णामध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे किती रूग्णांना विषबाधा झाली याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून अद्याप मिळू शकली नाही. खासगी रूग्णालयात किती रूग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याबाबत शासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे.
ही आहेत विषबाधेची कारणे
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस असला तरी पूरक पावसामुळे कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक आहे. या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतक-यांच्या चेह-यावर उडतो. नाका-तोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणाºया चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिविषारी कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतकºयांना आलेल्या घामामुळे उघड्या त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचे अंश शरीरात जातात आदी कारणांमुळे शेतकºयांना कीटकनाशकांची विषबाधा होते.
कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत शेतकºयांमध्ये जागृती करण्यात येत आहे. सुरक्षित वापराचे निकष पूर्ण न करणारी कीटकनाशके विकणा-या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.
- प्रवीण पोटे,
पालकमंत्री, अमरावती