जिल्ह्यात सराफा एकदिवसीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:53+5:302021-08-24T04:16:53+5:30
अमरावती : शासनाने सोने-चांदी विक्रीवर अतिरिक्त अटी लादल्याने जिल्हाभरातील सराफा व्यावसायिकांनी त्याचा विरोध करीत सोमवारी एकदिवसीय बंद पुकारला. या ...
अमरावती : शासनाने सोने-चांदी विक्रीवर अतिरिक्त अटी लादल्याने जिल्हाभरातील सराफा व्यावसायिकांनी त्याचा विरोध करीत सोमवारी एकदिवसीय बंद पुकारला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद राहिला. हॉलमार्कची अट मान्य आहे. मात्र एचयूआयडी ही अट मान्य नसून ती रद्द करण्याची मागणी सराफा व्यावसायिकांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
शहरात सराफ्याची मोठी १०५ दुकाने आहेत. तसेच किरकोळ ३० ते ३५ दुकाने आहेत. कोरोनामुळे संचारबंदीत ही सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. जेमतेम अनलॉक लागल्याने दुकाने सुरू झाली असून, ग्राहकांची आवकदेखील वाढली होती. त्यात शासनाने सोने विक्रीवर अनेक अटी लादल्यामुळे व्यापाऱ्यांची गोची झाली आहे. तीन महिन्यापूर्वी हॉलमार्कची अट लादली. ती व्यापाऱ्यांनी मान्य केली. त्यानंतर एयूआयडीची अट लादली गेली. त्यात विक्रीची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने थोडीही नजरचूक झाल्यास दुकान सील होऊन लाखोंचा दंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे गोल्ड संघटनेतर्फे तीन दिवसांपूर्वी प्राप्त पत्रानुसार एचयूआयडीची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरात सोमवारी एकदिवसीय बंद पाळण्यात आल्याची माहिती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भंसाली यांनी लोकमतला दिली.
बॉक्स
जिल्ह्यात एकच हॉलमार्क सेंटर
शासनाने सोने विक्रीवर१५ जून रोजी हॉलमार्कची अट लादली खरी. मात्र, सेंटर अत्यल्प दिले आहे. देशभरात ७५० जिल्ह्यात २५६ सेंटर उपलब्ध केले आहे. अमरावती जिल्ह्यात सराफ्याच्या ३६० सराफा दुकाने असताना एकच हॉलमार्क सेंटर उपलब्ध आहे. तरीही व्यापाऱ्यांनी हॉलमार्कची अट मान्य केली आहे.
-
काय आहे एचयूआयडी?
एचयूआयडी हे ऑनलाईन विक्रीचे केंद्र आहे. यामध्ये सहा डिजिट नंबर ऑनलाईन पोर्टलवर टाकून सोने विक्री करण्याची प्रक्रिया होते. मात्र, ते नंबर अतिशय बारीक असल्याने चेष्म्यातून पाहूनही दिसत नाही. एखादा नंबर चुकीचा टाकल्यास विक्रीत घोळ होऊन दुकान सील केले जाऊ शकते. गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्ष कारावास आणि ५ लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे एचयूआयडी ही अट रद्द करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
कोट
एचयूआयडी ही अट सोने विक्रीसाठी घातक असल्याने याच्या निषेधार्थ गोल्ड संघटनेच्या म्हणण्यानुसार आम्ही सोमवारी एकदिवसीय बंद पुकारला. यासंदर्भात पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
- राजेंद्र भंसाली, अध्यक्ष, सराफा असोसिएशन