‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: July 2, 2014 11:10 PM2014-07-02T23:10:01+5:302014-07-02T23:10:01+5:30
‘लोकमत’वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रध्देय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुधवारी ‘लोकमत’च्या अमरावती युनिट कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला
अमरावती : ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रध्देय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुधवारी ‘लोकमत’च्या अमरावती युनिट कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत गाडगेबाबा रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात १०० पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी हे संपूर्ण आयुष्य सामाजिक जाणिवेतून जगले. त्याच सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोेजन दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी केले जाते.
या शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी माणिकराव मोरे काका यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. त्यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि बाबुजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आमदार यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होत्या. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या विशेष कामगिरीबाबत मोरे काका यांना तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम व तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले आहे.
शिबिरासाठी संत गाडगेबाबा ब्लड बँक अँड कंपोनन्टचे सचिव सोपान गोडबोले, रक्त संक्रमण अधिकारी अनिल कविमंडन, अमित आरोकार, सुबोध क्षीरसागर, विकास खंडार, आकाश लाकडे, तश्विनी वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)