सीईओंची घरकूल बांधकामासाठी ‘स्पॉट व्हिजिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:15 PM2018-07-17T23:15:32+5:302018-07-17T23:16:36+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रखडलेली घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यातील ४० टक्के वा त्यापेक्षा अधिक माघारलेल्या गावांत त्या ‘स्पॉट व्हिजिट’ करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रखडलेली घरकुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक तालुक्यातील ४० टक्के वा त्यापेक्षा अधिक माघारलेल्या गावांत त्या ‘स्पॉट व्हिजिट’ करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.
जिल्ह्यातील रखडलेली घरकुल बांधकामे मार्गी लावण्यासाठी सीईओ मनीषा खत्रींनी पंचायत समितीनिहाय दौरे व बैठकींची मोहीम सुरू केली आहे. यासोबतच सीईओ व अधिनस्थ अधिकारी माघारलेल्या गावात पोहोचून संबंधित लाभार्थीची थेट भेट घेत आहेत. थेट लाभार्र्थींशी संवाद साधून घरकुल बांधकामातील अडचणी सीईओंनी जाणून घेतल्या. यानंतर पंतप्रधान आवास योजनेत मागे असलेल्या ३०० ग्रामपंचायतींमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्यासह अधिकाऱ्यांनी ‘आॅन दी स्पॉट’ घरकुलाची कामे मार्गी लावण्यासाठी त्वरित निराकरण करण्यावर भर दिला आहे.
३०० गावे टार्गेट
सन २०१६-१७ मध्ये ११ हजार ६४६ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ११ हजार ७३ लाभार्थींना पहिला, तर ९ हजार ६४० लाभार्थींना दुसरा हप्ता दिला आहे. सन २०१७-१८ मध्ये १६ हजार ३५४ उद्दिष्ट होते. १२ हजार २३३ लाभार्थींना पहिला, तर ७ हजार ५९१ जणांना दुसरा हप्ता अदा केला. मात्र, या दोन्ही वर्षात २७ हजार पैकी ९ हजार ५१५ घरकुल पूर्ण झाले आहे. सीईओ खत्री यांनी डीआरडीए, सर्व बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडून आढावा घेतला.
सीईओंच्या मोहिमेचा धसका घेऊन आतापर्यंत ५०० घरकुलाचे कामे पूर्ण झाली. विशेष म्हणजे, घरकुलाची कामे पूर्ण करण्यासाठी सीईओंनी झेडपीच्या कंत्राटदार असोसिएशनला पत्र देऊन वाळूसह साहित्य उपलब्ध करण्याची मागणी केली होती. कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष राजू मुंधडा यांनी साहित्य उपलब्ध केले आहे. पहिल्यांदाच सीईओ थेट गावात पोहोचत असल्याने जिल्हाभरातील घरकुलांची कामे मार्गी लागत आहेत. आतापर्यंत धामणगाव रेल्वे, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा या तालुक्यांमध्ये सीईओंनी स्पॉट व्हिजिट दिल्या. ही मोहीम काही दिवस सुरू राहणार असून, येत्या विजयादशमीपर्यंत सर्व लाभार्थींना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्याचे सीईओंचे टार्गेट आहे.
माघारलेली गावे टार्गेट
सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांत घरकुल बांधकामात ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम सुरू झाले नाहीत. घरकुल बांधण्यासाठी पहिला हप्ता दिल्यानंतरही कामे सुरू केली नाहीत. त्यांची तालुकानिहाय यादी तयार करण्याचे आदेश बीडीओंना सीईओंनी दिले होते. त्याप्रमाणे प्राप्त यादीनुसार घरकुल बांधकामात मागे आहेत. अशी गावे सीईओचे टार्गेट असून, या गावांत स्पॉट व्हिजिट होत आहे.
चार जणांचे पथक
घरकुलाच्या कामात मागे असलेल्या गावांमध्ये सीईओ मनीषा खत्री यांच्या नेतृत्वात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक यांचे चार सदस्यीय पथक थेट संबंधित गावात पोहोचून लाभार्थींची भेट घेऊन घरकुलाची कामे सुरू करण्यास प्रोत्साहन देत आहेत.कुचराई केल्यास कारवाई
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधणीसाठी पहिल्या हप्त्याची उचल केल्यानंतरही ते सुरू न केलेल्या संबंधित लाभार्थींच्या मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे. ज्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कुचराई करतील, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.
पर्यायी व्यवस्थेतून घरकुलाची कामे
ज्या लाभार्थींनी घरकुलाचा पहिला हप्ता घेऊन कामे सुरू केली नाहीत, त्यांच्या कुटुंबीयांची मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या पथकाने समाजमंदिरात पर्यायी व्यवस्था करून घरकुलाच्या कामाचा शुभारंभ स्वत: हजर राहून केला. यात दर्यापूर, धामणगाव रेल्वे व अन्य तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे.
कित्येक महिन्यांपासून घरकुलाचा प्रश्न रखडला होता. या कामांना गती देण्यासाठी पदाधिकारी, सदस्य व सीईओंनी पुढाकार घेतला. गोरगरिबांच्या हक्काच्या निवाºयाचा प्रश्न निकाली निघत असल्याचे समाधान आहे.
- नितीन गोंडाणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद
घरकुल बांधकामात ३०० गावे माघारली आहेत.त्यामुळे या सर्व गावांना मी व सहकारी अधिकारी प्रत्यक्ष भेटी देणार आहोत. दसºयापर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, आतापर्यंत ८० गावांना भेटी दिल्या आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य लाभत आहे.
- मनीषा खत्री, सीईओ