गणेशमूर्ती विघटनासाठी रसायनांची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:53 PM2018-11-28T22:53:30+5:302018-11-28T22:53:48+5:30
प्रथमेश तलावात विर्सजित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विघटनासाठी महापालिकेने काहीच केले नसल्यामुळे पर्यावरणाची हानी व मूर्तीची विटंबना होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी जनदरबारात मांडले. याची गंभीर दखल घेत संबंधित चार विभागांनी बुधवारी या मूर्तींच्या विघटनासाठी रसायनांची फवारणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रथमेश तलावात विर्सजित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींच्या विघटनासाठी महापालिकेने काहीच केले नसल्यामुळे पर्यावरणाची हानी व मूर्तीची विटंबना होत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी जनदरबारात मांडले. याची गंभीर दखल घेत संबंधित चार विभागांनी बुधवारी या मूर्तींच्या विघटनासाठी रसायनांची फवारणी केली.
महापालिकेने अतिक्रमण विभाग, झोन क्र. ३, पर्यावरण व प्रदूषण विभाग व आरोग्य विभाग यांनी संयुक्त कार्यवाही करीत या गणेशमूर्ती विघटनासाठी रसायनांची फवारणी केली. एकाच ठिकाणी या मूर्ती विघटित करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. गणेश विर्सजनासाठी पक्क्या टाक्या निर्माण करणे, प्लास्टर आॅफ पॅरीस विरघळविण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटच्या भुकटीचा वापर महत्त्वाचा आहे.
किंबहुना बऱ्याच ठिकाणी तो झालाच नाही. आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मूर्तीच्या रंगातील जड क्षार, पारा, शिशे, कॅडमिअम यासारखे घटक भूगर्भात शिरून नागरिकांना घातक आजारासाठी कारणीभूत ठरू शकतात आणि या जल व वायू प्रदूषणासाठी आयुक्तांवरदेखील कारवाई होऊ शकते, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. उशिरा का होईना, महापालिकेला जाग येऊन दरवर्षीप्रमाणेच प्रक्रिया करण्यात आली.