भाऊसाहेबांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 06:00 AM2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:30+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२१ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ना. थोरात यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने डॉ. पंजाबराव देशमुख सायन्स इनोव्हेटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते यावेळी झाले.

Spread the thoughts of bhausaheb to the youth | भाऊसाहेबांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवा

भाऊसाहेबांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवा

Next
ठळक मुद्देबाळासाहेब थोरात : डॉ.पंजाबराव देशमुख यांचा १२१ वा जयंती उत्सव, सायन्स इनोव्हेटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी आजच्या तरुण पिढीपर्यंत डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे विचार पोहचविण्याची गरज आहे, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२१ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ना. थोरात यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने डॉ. पंजाबराव देशमुख सायन्स इनोव्हेटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते यावेळी झाले. संशोधनाला चालना मिळण्यासाठी संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे अडीच कोटी खर्चून हे केंद्र उभारण्यात आले आहे.
व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत, संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. सुलभा खोडके, आ. बळवंत वानखडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिसन ओझा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, महापौर चेतन गावंडे, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, गजानन पुंडकर, सचिव शेषराव खाडे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेटकर, अशोक ठुसे, स्वीकृत सदस्य वि.गो. ठाकरे, पी.एस. वायाळ, प्राचार्य प्रमोद देशमुख, महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांची उपस्थिती होती.
महसूलमंत्री पुढे म्हणाले, सन १९०० ते १९५० या कालखंडात दोन महायुद्धे, कम्युनिस्ट क्रांती, महात्मा गांधींची चळवळ अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. याच कालखंडात अमरावतीच्या भूमीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अशी महनीय व्यक्तिमत्त्वे घडली. आधुनिक, पुरोगामी समाजाची पायाभरणी त्यांनी केली. भाऊसाहेब हे घटना समितीचेही सदस्य होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत अनेक कार्यांत त्यांचा सहभाग होता. संविधानाच्या प्रास्ताविकेत लोकशाही मूल्यांचा सार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत म्हणाले की, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, तरच भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल. याप्रसंगी काकोडकर म्हणाले, आजच्या काळात शिक्षणाच्या नव्या दिशा चोखाळण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सायन्स इनोव्हेटिव्ह अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरची स्थापना महत्त्वपूर्ण ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये आविष्कार व संशोधनाची वृत्ती निर्माण करण्यासाठी हे केंद्र योगदान देईल. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्याचा प्रयत्न करण्यात येतील.
संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. शासनाने त्याकरिता मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आमदार सुलभा खोडके यांनी शासनाच्यावतीने संस्थेला मदत करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी महसूलमंत्र्यांच्या हस्ते भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शीतल मेटकर व चमूने यांनी ‘शिव संस्कृती दर्शन’ हा नृत्यमय कार्यक्रम सादर केला. राजेश उमाळे यांनी स्वागतगीत व मानवंदनेचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन दिलीप इंगोले यांनी केले.

न्यायाधीशपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव
न्यायाधीशपदी निवड झालेल्या संस्थेच्या सात विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणय मालवीय व प्राध्यापक राजेश पाटील यांचाही गौरव करण्यात आला. नागपूरची मालविका बन्सोड या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू विद्यार्थिनीचा सत्कार तिच्या वडिलांनी स्वीकारला. श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक वेलफेअर सोसायटीकडून संस्थेला प्रदान करण्यासाठी २७ लाख रुपयांचा धनादेश अध्यक्षांना सुपूर्द करण्यात आला.

Web Title: Spread the thoughts of bhausaheb to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.