तूर खरेदीची बनवाबनवी
By admin | Published: April 27, 2017 12:07 AM2017-04-27T00:07:16+5:302017-04-27T00:07:16+5:30
जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रांवर असलेली २.३४ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे.
शासनाच्या आदेशाला यंत्रणांचा खो : समिती करणार पडताळणी
अमरावती : जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रांवर असलेली २.३४ लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीच्या सूचना दिल्या असल्या तरी जिल्ह्यात तूर खरेदी सुरू झालेली नाही. आता यार्डामधील तूर नाफेडऐवजी राज्य शासनाच्या पणन महामंडळाद्वारा खरेदी केली जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, एफसीआयच्या केंद्रांचा घोळ अद्याप निस्तरलेला नाही.
जिल्ह्यातील व्हीसीएमएफ, नाफेडचे चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, एफसीआयद्वारा अमरावती व धामणगाव रेल्वे व डीएमओद्वारा अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर व वरूड येथील शासकीय तूर खरेदी केंद्र २२ एप्रिलपासून बंद करण्यात आले. यासर्व केंद्रांवर १४ हजार ५९८ शेतकऱ्यांना टोकन दिले असून या शेतकऱ्यांची दोन लाख ३४ हजार २९७ पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींद्वारा आक्रमक भूमिका घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून यार्डातली तूर खरेदी करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र, तूर खरेदी सुरू न झाल्याने मंगळवारी आ. बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
मुख्यमंत्र्यांनी पुन्हा यार्डातील तूर खरेदीची ग्वाही माध्यमांना दिल्यानंतर आ. कडू यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र, प्रत्यक्षात बुधवारपर्यंत कोणत्याही शासकीय खरेदी केंद्रांवर तूर खरेदी झालेली नाही. यार्डातील तूर खरेदी आता नाफेडऐवजी शासनाचे अधिनस्त राज्य सहकारी पणन् महामंडळाद्वारा खरेदी करण्यात येणार आहे. मात्र, ही तूर खरेदी करण्याचे सुस्पष्ट आदेश नसल्याने वृत्त लिहेस्तोवर कुठलीही खरेदी सुरू झाली नाही. (प्रतिनिधी)
समितीच्या पडताळणीनंतर अनुक्रमाने खरेदी
यार्डात पडून असलेली २.३५ लाख क्विंटल तूर व १४५९८ टोकनची पडताळणी एसडीओ, तहसीलदार व सहायक निबंधकांचा समावेश असलेली समिती करणार असून पडताळणीच्या अनुक्रमाने तूर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग विभागाद्वारा देण्यात आली.
मार्केटिंग फेडरेशनद्वारा खरेदी
यार्डात पडून असलेली तूर खरेदी आता केंद्राऐवजी राज्य शासनाच्या अधिनस्थ महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाद्वारा करण्यात येणार असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. अपर जिल्हाधिकारी म्हणतात तूर खरेदीचे आदेश दिलेत. मात्र, जिल्ह्यातील एकाही केंद्रावर तूर खरेदी सुरू झालेली नाही.
२.३४ लाख पोते तूर
मोजणीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यातील दहा केंद्रांवर १४ लाख ५९८ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहे. याशेतकऱ्यांचे २ लाख ३४ हजार २९७ पोते मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये चांदूररेल्वे २०००, नांदगाव खंडेश्वर ८५००, मोर्शी १२०००, अमरावती ३६०००, धामणगाव २०२५०, अचलपूर २५२५८, अंजनगाव २५२२५, चांदूरबाजार २३०२३, दर्यापूर ५१५४१, वरुड २८००० व धारणी केंद्रावर २५०० पोते पडून आहेत.
एफसीआयचे दोन केंद्र वगळता उर्वरित केंद्रांवर तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांमार्फत देण्यात आले आहेत. आता ही तूर खरेदी राज्य शासनाद्वारा होणार आहे.
- के. आर. परदेशी
अपर जिल्हाधिकारी
तूर खरेदी केंद्रांशी संबंधित समिती यार्डातील तुरीच्या टोकनविषयीची पडताळणी करेल. त्यांनी सूचविलेल्या अनुक्रमांकाने तुुरीची खरेदी करण्यात येईल.
- अशोक देशमुख
जिल्हा मार्केटिंग अधिकारी
यार्डातील तूर खरेदीविषयीचे आदेश आमच्या कार्यालयास अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कार्यकारी संचालकांचे आदेश आल्यानंतर सूचनेप्रमाणे तूर खरेदी करण्यात येईल.
- राजेश विधळे
व्यवस्थापक, व्हीसीएमएफ.