‘एसपीं’चे विशेष पथक कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:50 PM2018-03-25T23:50:44+5:302018-03-25T23:50:44+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली.

SP's special squad Kuchkami | ‘एसपीं’चे विशेष पथक कुचकामी

‘एसपीं’चे विशेष पथक कुचकामी

Next
ठळक मुद्देअवैध वाहतूक फोफावली : दरदिवशी एका ठाण्यात आठ केसेस

संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील ३१ पैकी १२ ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर विशेष वाहतूक नियंत्रण पथक वर्षभरापूर्वी गठित केले. मात्र, आतापर्यंत या पथकाकडून झालेल्या कारवाईचा लेखाजोखा बघितला तर एका ठाण्यात प्रतिदिन आठ वाहनांवरच कारवाई करण्यात आली. परिणामी अवैध वाहतूक सुरूच असल्याचे वास्तव असून, ‘एसपीं’चे हे पथक कुचकामी ठरल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ग्रामीण वाहतूक शाखेकडे सोपविली आहे. परंतु, ग्रामीण भागात अवैध वाहतूक फोफावल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी १२ पोलीस ठाण्यांतर्गत ६२ शिपाई असलेल्या विशेष पथकाचे गठन केले. विशेषत: या पथकात ‘एसपीं’ने मुख्यालयातून दोन पथकाचे गठन करून त्यात एका पोलीस निरीक्षकांसह १६ शिपायांची नियुक्ती केली. प्रारंभी या विशेष पथकाने जिल्ह्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी चांगली कामगिरी बजावली. दरम्यान, ‘एसपीं’च्या या पथकाने ग्रामीण भागातील ठाणेदारांची भंबेरी उडाली. मात्र, आॅगस्ट २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यत सात महिन्यांत २० हजार ६१२ वाहतूक नियमांचे उल्लंघन, अवैध वाहतुकींविरूद्ध केस दाखल केला. या कारवाईत ५२ लाख ६ हजार रूपये दंड वसूल केला. कारवाईची ही सरासरी प्रतिमहा २९४४ केसेस दाखल केल्याचे दिसून येते.
विशेष पथकाने केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार प्रति पोलीस ठाणे अवैध वाहतुकीचे २४५ प्रकरणे दर महिन्याला दाखल झाल्याचे स्पष्ट होते. या एकूण आकडेवारीचा गोषवारा बघितला तर १२ पोलीस ठाण्यांत दरदिवशी आठ केसेस दाखल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, जिल्ह्यातील माहिती घेतली असता आजही मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. ‘एसपीं’नी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक नेमल्याने ठाणेनिहाय होणारी कारवाई मंदावली आहे.या पथकामुळे वाहतूक पोलिसांचे अधिकार गोठविले असून ठाणेदारांमध्ये कमालिची अनास्था आली आहे. परंतु विशेष बाब म्हणून ठाणेदारांना चालान बूक दिल्याची माहिती आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक
ग्रामीण भागात काळीपिवळी, आॅटोरिक्षा, मिनीडोर, खासगी बसेस, ट्रॅव्हल्स अशा विविध प्रकारच्या वाहनातून नियमबाह्य वाहतूक सुरू आहे. काळीपिवळी वाहनांमध्ये तर २० ते २५ प्रवासी वाहतूक होते. बसस्थानकासमोर अवैध वाहतुकीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक शिपाई फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. किरकोळ अपघाताच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी येत्या काळात गंभीर अपघाताची प्रतीक्षा पोलिसांना आहे काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ग्रामीण भागात १२ ठाण्यांत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथक गठीत केले आहे. या पथकात १२ ठाण्याचे पोलीस शिपाई असले तरी मुख्यालयातून दोन स्वतंत्र पथकात १६ शिपाई आहे. विशेष पथकाकडून दरदिवशी ५० ते ६० केसेस दाखल करण्याचे टार्गेट आहे. ठाणेदारांनाही स्थानिक पातळीवर कारवाईसाठी चालान बूक दिले आहेत.
- विलास कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, ग्रामीण वाहतूक शाखा

Web Title: SP's special squad Kuchkami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.