लोकमान्यांचा हेतू श्रीगणेशोत्सव मंडळाने नेला सिध्दीस
By admin | Published: March 8, 2016 12:04 AM2016-03-08T00:04:09+5:302016-03-08T00:04:09+5:30
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची निर्मिती सामाजिक विधायक कायार्साठी केली होती.
पालकमंत्री प्रवीण पोटे : नाला खोलीकरणासाठी दीड लाख रुपये
अमरावती : लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची निर्मिती सामाजिक विधायक कायार्साठी केली होती. लोकमान्य टिळकांचा त्यावेळचा खरा उद्देश सोमवारी श्रीगणेशोत्सव मंडळाच्या सहभागातून नाला खोलीकरणाच्या माध्यमातून साध्य झाल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी काढले.
मासोद येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत श्रीगणेशोत्सव मंडळ, टोपेनगर यांच्या लोकसहभागातून नाला खोलीकरण कार्यक्रमाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, श्रीगणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण पातुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकरी आभाळे, संवर्ग विकास अधिकारी कापडे, मासोदच्या सरपंच वंदना केकतकर, उपसरपंच रवी काळबांडे, पंचायत समिती सभापती आशीष धर्माळे, मंडळाचे कार्यकर्ते प्रणय कुलकर्णी, अभिनव देशमुख, प्रशांत लांडोरे, अमृता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात किरण पातुरकर यांनी केले. श्रीगणेशोत्सव मंडळाने यापूर्वी देखील ११ विधवांना प्रत्येकी दहा हजारांची मदत करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे पातुरकर यांनी सांगितले. १०० शेततळे केल्यास मासोद हे गाव दत्तक घेऊ असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी गीत्ते यांनी मंडळाने दिलेला दीड लाखांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी दीड कोटींचे उत्पन्न देणारा ठरणार असल्याचे सांगितले. ५१४ बंधारे जिल्ह्यात केल्याची माहिती देखील त्यांनी दिली. श्री गणेशोत्सव मंडळातर्फे दिलेल्या दीड लाखांच्या निधीमध्ये पालकमंत्र्यांनी साडेतीन लक्ष रुपये मंजूर केले असून एकूण पाच लक्ष रूपयांचे हे नाला खोलीकरणाचे काम करण्यात येणार आहे. पं.स. सभापती आशिष धर्माळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. संचालन शाखा अभियंता जी.एन. आवळे यांनी तर आभार प्रणय कुलकर्णी यांनी मानले. (प्रतिनिधी)