श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:19+5:302021-05-03T04:09:19+5:30
परतवाडा (अमरावती): हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
परतवाडा (अमरावती): हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. रेड्डी यांची अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहाच्या तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद गाडे यांच्या न्यायालयाने कोठडी सुनावली. रेड्डी यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने शनिवारी, दुपारी १ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीचे आदेश होताच १.३० वाजता धारणी पोलीस स्टेशनला आणून रीतसर बयाण व नोंद घेण्यात आली. त्यानंतर पोलीस वाहनांमध्ये बंदोबस्तात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले; परंतु धारणी पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची पोलीस कोठडीत वाढ मागण्यात आली नसल्याचे सरकारी अभियोक्ता भारत भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रेड्डींना धारणी पोलीस ठाण्यात २९ एप्रिल गुरुवारी एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून लॉकअपमध्ये टाकण्यात आले होते.
बॉक्स
पोलीस अधीक्षकांनी केली चौकशी
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी पोलीस कोठडीत असलेल्या निलंबित आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांची शुक्रवारी सायंकाळी धारणी येथे जाऊन घटनेसंदर्भात चौकशी केली. त्यादरम्यानच तपास अधिकारी तथा एसडीपीओ पूनम पाटील ठाणेदार, विलास कुलकर्णी, सपोनि प्रशांत गिते आदी उपस्थित होते. मात्र, पोलीस अधीक्षकांनी बंद खोलीत तपास अधिकारी पूनम पाटील यांच्या उपस्थितीत चौकशी केली. चौकशीत नेमके कुठले प्रश्न आरोपी श्रीनिवास रेड्डी यांना केले हे मात्र कळू शकले नाही.