श्रीनिवास रेड्डींना १२ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:53+5:302021-05-03T04:08:53+5:30
फोटो पी ०२ रेड्डी धारणी : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या आरोपात सहआरोपी असलेल्या ...
फोटो पी ०२ रेड्डी
धारणी : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या आरोपात सहआरोपी असलेल्या निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना १२ मेपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने रेड्डी यांना नागपूरहून अटक करीत गुरुवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले असता तेथे त्यांना दोन दिवसांची अर्थात १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा शनिवारी १ वाजता रेड्डी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम. एस. गाडे यांनी त्यांना १२ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
मेळघाटातील बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याच्यावर कलम ३०६ अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीत निष्पन्न झालेल्या अहवालावरून गुन्हे वाढवून मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करण्यात आले होते. श्रीनिवास रेड्डी यांना धारणी पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत सामान्य कैद्याप्रमाणे दोन रात्री काढाव्या लाागल्या. शनिवारी ठाणेदार विलास कुलकर्णी, पोलीस कर्मचारी सुभाष सावरकर, योगेश राखोंडे यांनी रेड्डी यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. तेथे तपासी अधिकारी पूनम पाटील गैरहजर होत्या. आरोपीचे वकील मनीष जेसवानी यांनी आरोपीची तपासकामी पोलिसांना गरज नसल्याची बाजू मांडली..
स्वत:ची कपड्यांची बॅग टाकली पोलीस वाहनात
रेड्डी यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर एपीआय प्रशांत गीते यांच्या पथकाने त्यांची अमरावती कारागृहाकडे रवानगी केली. त्यावेळी रेड्डी यांनी स्वतःच्या कपड्यांची बॅग पोलीस वाहनात स्वत:च ठेवली. पदावर असताना रेड्डी वाहनातून उतरताना वाहनांचे दरवाजे उघडणे व इतर काही वस्तू वाहनात टाकण्याकरिता तेथे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत होते.
बॉक्स
एसपी धारणीत अचानक कशासाठी ?
पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी शुक्रवारी धारणी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. त्या संदर्भात धारणीचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या पीआरओंकडे अंगुलिनिर्देश केला. श्रीनिवास रेड्डी धारणी पोलीस ठाण्यात असताना तेथे पोलीस अधीक्षकांची भेट हा विषय चर्चेचा ठरला आहे.
पोलीस ठाण्यातच विचारपूस
तपासी अधिकारी पूनम पाटील यांनी आरोपी रेड्डी यांचा पीसीआर घेतला; परंतु दोन्ही दिवस फक्त पोलीस ठाण्याच्या आवारातील एका खोलीमध्ये त्यांची विचारपूस केली. रेड्डी यांचे मुख्य कार्यालय अमरावती येथे असल्याने तपासकामी त्यांना अमरावतीला नेण्याचे काम पोलिसांना पडले नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.