एसआरपीएफ : सातच्या आत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:34 AM2019-08-14T01:34:16+5:302019-08-14T01:36:29+5:30
वडाळी स्थित एसआरपीएफच्या कॅम्प येथील पाचशे क्वार्टरमधील रहिवासी सातच्या आत घरात जाण्यासाठी बाध्य झाले आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांना घरातून बाहेर निघणेही धोक्याचे वाटू लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी स्थित एसआरपीएफच्या कॅम्प येथील पाचशे क्वार्टरमधील रहिवासी सातच्या आत घरात जाण्यासाठी बाध्य झाले आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांना घरातून बाहेर निघणेही धोक्याचे वाटू लागले आहे. बिबट्याने पोलीस निरीक्षक मारोती नेवारे यांच्या बंगल्यावरील श्वानास उचलून नेल्यामुळे एसआरपीएफ कॅम्प परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस निरीक्षक नेवारे यांच्याकडील २० हजार रुपये किमंतीचे श्वान बिबट्याने मध्यरात्री उचलून नेल्याची तक्रार वनविभागाला सोमवारी प्राप्त झाली. त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी सायंकाळी नेवारे यांच्या घरी पोहोचले. त्यांच्याकडून माहिती घेऊन वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून श्वानाचे पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, सोमवारी सायंकाळी पुन्हा बिबट्यांचा मुक्त संचार नागरिकांनी पुन्हा एकदा अनुभवला. बिबट एसआरपीएफ कॅम्पशेजारीच फिरत असल्याचे नागरिकांना आढळून आले.
एसआरपीएफ कॅम्प परिसरात तब्बल १ हजार १५० क्वार्टर असून, त्यात सुमारे तीन हजार नागरिकांचे वास्तव्य आहेत. तेथील कुटुंबांमध्ये लहान मुले असून, ते अनेकदा बाहेरील परिसरात खेळत-बागडत असतात. त्यातच बिबट्याचे मुक्त संचार असल्यामुळे नागरिकांना आपल्या मुलांची काळजी वाटू लागली आहे. सायंकाळी अंधार पडताच नागरिक घरातून बाहेर निघणे टाळू लागले आहेत. लहान मुलांना तर सातच्या आत घरात येण्यास सांगितले जात आहे.
बिबट श्वानाला उचलून नेऊ शकतो, तर त्याच्या तावडीत लहान मुले लागल्यास त्यांनाही उचलून नेण्याची शक्यता आहे, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. येथील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलावी, अशी मागणी नागरिकांची आहे. गत दोन दिवसांपासून एसआरपीएफ कॅम्प परिसरातील कर्मचारी बिबट्याच्या दहशतीत वावरत आहेत.
बिबट्याला हाकलले
बिबट्याने ११ आॅगस्ट रोजीच्या मध्यरात्री एसआरपीएफ कॅम्प परिसरातून एका श्वानाला उचलून नेले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारासदेखील बिबट नागरिकांच्या दृष्टीस पडला. त्यामुळे अजूनही एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे नागरिकांना लक्षात आले. ही बाब लक्षात घेता एसआरपीएफ जवानांनी बिबट्याचा मागोवा घेत त्याला जगंलाकडे हाकलूनसुद्धा लावले.
श्वानाला उचलून नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी बिबट पुन्हा परिसरात फिरताना आढळला होता. क्यूआरटी पथकाने बिबटाला जगंलाच्या दिशेने हुसकावले. एसआरपीएफ क्वार्टर परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत पसरविली आहे.
- एम.बी. नेवारे
पोलीस निरीक्षक
एसआरपीएफ