एसटी आगारात प्रवाशांचा धिंगाणा
By Admin | Published: April 3, 2017 12:16 AM2017-04-03T00:16:38+5:302017-04-03T00:16:38+5:30
जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवाशी वाहतूक असलेल्या परतवाडा मार्गावर बस गाड्या नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी रात्री धिंगाणा घातला.
परतवाडा मार्गावर बसगाड्यांचा अभाव : खासगी वाहतूकदारांसोबत हातमिळवणी
अमरावती: जिल्ह्यात सर्वात जास्त प्रवाशी वाहतूक असलेल्या परतवाडा मार्गावर बस गाड्या नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी येथील मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी रात्री धिंगाणा घातला. अखेर आगार व्यवस्थापकांना दोन पावले मागे घेत रात्री १० वाजून १५ मिनिटांनी बस सोडावी लागली.
अमरावती- परतवाडा मार्गावर प्रवाशी वाहतूक संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरिदेखील शनिवारी रात्री ८ वाजून १५ मिनीटांनी अमरावती आगारात परतवाडा मार्गावर बस गाडी नव्हती. परतवाडा मार्गासाठी बस गाडी नसल्याचे कारण शोधून घेण्यासाठी प्रवाशांनी चौकशी कक्षाकडे धाव घेतली. मात्र, चौकशी कक्षातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना व्यवस्थित माहिती न देता उद्धट वागणूक दिली. बस नादुरुस्त असल्याने सोडता येत नाही. बस येईल तेंव्हा सोडू अशा वेगवेगळ्या कारणांनी प्रवाशी चिढले. त्यानंतर प्रवाशांचा संयम सुटला. दोन तासभर प्रवाशांनी गोंधळ वजा धिंगाणा घालून चौकशी कक्षासमोर बस सोडण्याची मागणी रेटून धरली. काही वेळाने पोलिसही पोहचले. मात्र रात्री ८ वाजून १५ मिनीटाने परतवाडा मार्गावर बसचे शेड्युल्ड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परतवाडा मार्गावर अवेळी बस सोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु असल्याची गाऱ्हाणी प्रवाशांनी मांडली. परतवाडा मार्गावर जास्त प्रवाशी संख्या मिळत असताना बस फेऱ्या कमी करण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. दरम्यान प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडण्यात आली.